Chhagan Bhujbal

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

छगन भुजबळांनी फटकारले, `काळजी घ्या, कारवाईची वेळ आणू नका`

नाशिकमध्ये सोमवारपासून दहावी-बारावी वगळता शाळा बंद राहणार

Sampat Devgire

नाशिक : शहर व जिल्ह्यात (Nashik) पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तिसऱ्या लाटेचा (Covid) धोका विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने येत्या सोमवार पासून ३१ जानेवारीपर्यंत पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकला कोरोना वाढतोय, काळजी घ्या. कारवाई करण्याची वेळ आणू नका, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला.

श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी या वेळी उपस्थित होते.

रुग्णसंख्या वाढीचा वेग एकास दहा

श्री. भुजबळ म्हणाले, की २८ डिसेंबरला ४२१ वर असलेली कोरोनाची रुग्णसंख्या ५ जानेवारीला एक हजार ४६१ झाली. आठवडाभरात हजार रुग्ण वाढले. यात अखेरच्या एका दिवसात पाचशे रुग्ण वाढले आहेत. शहर व ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. अडचणी खूप आहेत. पावले उचलावी लागतील. मास्क वापरा, अंतर ठेवा, कार्यक्रमाला गर्दी करू नका, असेही त्यांनी बजावले. सातत्याने गर्दी वाढत आहे. पूर्वी एका रुग्णामुळे दोन जण वाढायचे आता दहा जण वाढत आहेत. लॉकडाउन हा उपाय नाही. त्यातून गोरगरीब अडचणीत येतात. त्यामुळे सर्वंकष विचार करून निर्णय घ्यावा लागेल.

ते म्हणाले, की येत्या सोमवारपासून दहावी-बारावी सोडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. ‘नो व्हॅक्सिन- नो एन्ट्री’ या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल. प्रत्येक अस्थापनेवर त्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार असून, बाजार समित्या, प्रशासकीय कार्यालयांनी हा नियम पाळावा. व्हॅक्सिन नसल्यास रेशन न देण्याचा विचार सुरू आहे. आठवडाभर वाट पाहून त्यानंतर राज्यासाठी हा निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी विवाह साध्या पद्धतीने करावेत, असे आवाहान करीत भुजबळ म्हणाले, की कडक कारवाई करण्याची वेळ आणू नका. वेग थांबत नाही, तोपर्यंत मंदिर परिसरात गर्दी टाळा. विवाहासाठी ५०, तर अंत्ययात्रेला २० जणांना परवानगी राहील, याची कडक अंमलबजावणी व्हावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मालेगावचा अभ्यास

जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मालेगावला तुलनेने प्रमाण कमी आहे. याविषयी भुजबळ म्हणाले, की आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील नागरिकांत इम्युनिटी वाढली की कसे, याविषयीचा अभ्यास करून रुग्णसंख्या कमी असण्याच्या कारणाचा शोध घेतला जाणार आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT