Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: छगन भुजबळांच्या विरोधात उमेदवार कोण? जरांगे पाटील यांचे ठरेना!

Yeola Assembly Election: येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातील उमेदवारांना जरांगे पाटील यांच्या निर्णयाची प्रतीक्षा

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मंत्री छगन भुजबळ हे प्रमुख टार्गेट आहे. मात्र त्यांच्या विरोधात उमेदवार कोण? याचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांना त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ते उमेदवार आहेत. भुजबळ यांनी यंदाची निवडणूक जरा जास्तच गांभीर्याने घेतली आहे, असे चित्र आहे.

मंत्री भुजबळ यांना मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांनी खुले आव्हान दिले होते. मंत्री भुजबळ यांनी ते आव्हान स्विकारले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात? आणि कोणत्या उमेदवाराला आपला आशीर्वाद देतात याची उत्सुकता आहे.

जरांगे पाटील यांच्या त्या निर्णयावर येवला मतदारसंघाचे राजकारण अवलंबून आहे. येवला मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला आहे. या पक्षाने प्रारंभी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांना पसंती दिली होती.

श्री दराडे यांना जरांगे पाटील यांची सहमती घेण्याची सूचना केली होती. मात्र प्रयत्न करूनही जरांगे पाटील यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले नव्हते. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली.

श्री शिंदे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लासलगाव भागातील जयदत्त होळकर यांनीही आपला अर्ज दाखल केला. याशिवाय गोरख पगार आणि सचिन आहेर हे उमेदवार देखील आहेत.

मात्र मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दराडे यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली. यावेळी दराडे यांच्या समर्थकांनी यंदा उमेदवारी करावी, असा आग्रह धरला. त्यामुळे दराडे यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्री दराडे यांनी मनोज जरांगे पाटील एक वेगळा प्रयोग म्हणून आपल्याला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या निमित्ताने ओबीसी भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील यांचा ओबीसी दराडे टक्कर देतील. तसे झाल्यास ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.

श्री भुजबळ यांनी निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. त्यांच्याकडे साम, दाम, दंड, भेद अशी सर्वच नीती आहे. दराडे यांच्याकडे त्याला उत्तर देण्याची क्षमता आहे. अन्य उमेदवारांमध्ये तशी क्षमता नसल्याचे बोलले जाते.

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे यांची सर्व भिस्त शरद पवार आणि जरांगे पाटील यांचे मराठा कार्ड वर अवलंबून आहे. या मतदारसंघातील श्री दराडे, श्री शिंदे यांसह मंत्री भुजबळ यांचे विरोधक असलेल्या अन्य तीन उमेदवारांना मनोज जरंगे पाटील आपल्यापैकी कोणाची निवड करतात आणि कोणाला पाठिंबा देतात याची उत्सुकता आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या बाबत जरांगे पाटील यांचा उमेदवार आणि स्ट्रॅटेजी काय असेल, यावर येवला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवलंबून असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT