Woman Kidnapping : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकेला लिफ्टच्या बहाण्याने अपहरण करून दिवसभर ओलीस ठेवत मारहाण व लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणात नेवासा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत मुख्य आरोपी अशोक भानुदास तांबे (रा. सलाचतपूर, ता. नेवासा) याला अटक केली आहे.
गंगापूर तालुक्यातील शिगी येथील ताराबाई रामचंद्र झिंजुडे या अंगणवाडी सेविका असून, त्या गुरुवारी देवगड येथे जाण्यासाठी देवगड फाट्यावर उभ्या होत्या. त्यावेळी एका कार चालकाने 'मलाही देवगडला जायचे आहे, चला सोडतो,' असे सांगत त्यांना कारमध्ये बसवले. मात्र, कार देवगडकडे न नेता खलालपिंप्रीमार्गे नेवाशाच्या (Newasa) दिशेने वळवण्यात आली.
आरोपीने ताराबाई झिंजुडे यांना रात्री साडेनऊपर्यंत कारमध्ये ओलीस ठेवले. विरोध केल्यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून घेत नेवासा, नगर, शनिशिंगणापूर, सोनई आणि ब्राम्हणी परिसरातील विविध मार्गांवर फिरवले. त्यानंतर एका निर्जन कच्च्या रस्त्यावर कार थांबवून लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी (Crime) केल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत गळ्यातील सुमारे सात ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर, 700 रुपयांची रोकड आणि पर्समधील महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 96 हजार 700 रुपयांचा ऐवज लुटला. तसेच साडीचा पदर फाडून हात-पाय बांधत ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दिवसभर फिरवून लुटल्यानंतर आरोपीने रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना महामार्गावर सोडून पलायन केले. जखमी अवस्थेत त्यांनी प्रथम गंगापूर येथे उपचार घेतले. त्यानंतर शनिवारी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने हालचाल करत रविवारी मध्यरात्रीनंतर मुख्य आरोपी अशोक भानुदास तांबे याला अटक केली.
या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात अपहरण, जबरी चोरी, खंडणीसाठी बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे, धमकी देणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीची ओळख परेड करण्याची प्रक्रिया तालुका दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष पार पडणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.