EKnath Khadase
EKnath Khadase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा खडसेंना राजकीय दणका

Sampat Devgire

जळगाव : राष्ट्रवादीचे (NCP) नेते, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे वर्चस्व व पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) चेअरमन असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Khadse) यांनी बरखास्त करून खडसेंना दणका दिला आहे. दूध संघातील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश देत दूध संघावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या नेतृत्वात अकरा जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. (Administrator appointment on Jalgaon District Milk fedration)

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर २०१५ मध्ये जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. त्यात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनल निवडून आले आणि खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे दूध संघाच्या चेअरमन झाल्या.

दोनदा मुदतवाढ

दरम्यान, २०२० मध्ये दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपली. मात्र, कोरोनामुळे सर्व प्रकारच्या निवडणुकांवर बंदी असल्याने संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आली. राज्यातील मविआ सरकारने पुन्हा निवडणूक स्थगित करत संचालक मंडळास दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. आता सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या, परंतु त्या निवडणुकांनाही ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती मिळाल्याने मुदतवाढ दिलेले संचालक मंडळच कार्यरत होते.

शिंदे सरकारचा दणका

राज्यात या महिन्याच्या सुरवातीला शिवसेनेत बंड होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार अस्तित्वात आले. शिंदे- फडणवीसांच्या या सरकारने मविआ सरकारचे अनेक निर्णय बदलवले, अनेक निर्णय व कामांना स्थगिती दिली. आता जिल्हा दूध संघाचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळच मख्यमंत्र्यांनी सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीचा आधार घेऊन बरखास्त करण्याचे आदेश आज जारी केले.

गैरव्यवहारांची चौकशी

शासनाचे उपसचिव एन.बी. मराळे यांनी याबाबतचे आदेश आज काढले. त्यानुसार दूध संघात गत काळात झालेल्या गैरव्यवहारांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे या आदेशात म्हटले असून त्यानुसार या गैरव्यवहारांची चौकशीही सुरु केल्याचे म्हटले आहे.

प्रशासक मंडळ नियुक्त

सहकार कायद्यातील तरतुदीनुसार शासनाने दूध संघावर अकरा जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. त्यात मुख्य प्रशासक म्हणन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण याची तर प्रशासक मंडळात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, भुसावळचे अजय भोळे, पारोळ्यातून अमोल चिमणराव पाटील, जामनेर तालुक्यातून गिरीश महाजनांचे निकटवर्तीय अरविंद देशमुख, चाळीसगाव तालुक्यातून राजेंद्र राठोड, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, धरणगावचे गजानन पाटील, पाचोऱ्याचे अमोल शिंदे, भडगावचे विकास पाटील यांचा समावेश आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT