Kishor Darade- Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kishore Darade Politics: "एकनाथ शिंदे हे तर देव", दुसऱ्यांदा आमदार झालेल्या दराडेंना साक्षात्कार

Sampat Devgire

Kishor Darade News : शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे दुसऱ्यांदा विजयी झाले. याबाबत त्यांनी विधान परिषदेत एक मोठे विधान केले. त्याची जोरदार चर्चा होत आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे ( Kishor Darade ) दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. ही निवडणूक विविध कारणांनी चर्चेत राहिली. आता आमदार दराडे यांनी विधान परिषदेत सदस्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले.

आमदार दराडे म्हणाले, "मी देव पाहिला नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे मला देवासारखेच आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच मी निवडून आलो. त्यांनी माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यामुळे ही निवडणूक जिंकता आली."

"मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी नेहमीच मला सहकार्य केले आहे. त्यामुळे शिक्षकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवता आले. विविध अडचणीत त्यांनी आम्हाला आधार दिला. या पुढील काळातही शिक्षकांच्या प्रश्नांवर आम्हाला त्यांची मदत होईल आणि चांगले काम करता येईल," असा विश्वास आमदार दराडे यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार दराडे म्हणाले, "राज्याच्या बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. यामध्ये सहा वर्षांपूर्वी माझे बंधू नरेंद्र आणि मी असे आम्ही सख्खे भाऊ आमदार झालो. तो एक मोठा योग आहे."

आमदार दराडे यांनी यावेळी आपल्या आईची आठवण देखील सांगितली. काहीसे भावनिक होत ते म्हणाले, "1999 मध्ये माझे बंधू नरेंद्र दराडे यांचा येवला विधानसभा मतदारसंघात 100 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर माझ्या आईची खूप इच्छा होती की, माझा मुलगा आमदार झाला पाहिजे. असे तिला सतत वाटत होते. लोकांमध्ये राहून चांगले काम केल्यामुळे तिचे हे स्वप्न पूर्ण झाले. तिचे दोन्ही मुले आमदार झालेत, हा मोठा आनंद देणारा प्रसंग आहे."

"गेल्या सहा वर्षात तीन मुख्यमंत्री आणि चार उपमुख्यमंत्र्यांसमवेत मी सभागृहात काम केले आहे. त्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न आम्ही मांडू शकलो. विविध मंत्री आणि सदस्यांनी याबाबत आम्हाला सदैव सहकार्य केले. सभागृहात कसे बोलावे हे देखील मला माहीत नव्हते. विविध सदस्यांनी याबाबत आम्हाला खूप माहिती दिली. विविध प्रकारचे मार्गदर्शन केले. त्यामुळे काम करता आले. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे सर्वाधिक सहकार्य राहिले," असा उल्लेख दराडे यांनी केला.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT