Nilesh Lanke
Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News : होय, ईडीवाले माझ्याकडे आले आणि येडे होऊन गेले : ईडी चौकशीच्या चर्चेवर नीलेश लंकेंचे भाष्य

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माझ्या ईडी (Ed) चौकशीबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण, माझी ईडीची चौकशी मागंच होऊन गेली. माझी २०२२ लाच ईडी चौकशी झाली आहे. ईडीचे लोक १५ दिवस पुण्यात बसले. एके दिवशी म्हणाले, या नीलेश लंकेकडे काही निघतच नाही. मनात म्हटलं ईडीवाले माझ्याकडे आले तर स्वतःच्याच खिशातील पैसे मला देत म्हणतील ‘हे धर तुलाच खर्चाला. त्यामुळे ईडीवाले माझ्याकडे आले आणि येडे होऊन गेले. आता कोणती चौकशी लागायची, अशा शब्दांत आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी ईडीच्या चौकशीच्या चर्चेवर भाष्य केले. (Commentary by Nilesh Lanke on the ED inquiry debate)

माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके (नगर तालुका) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्या सभेत आमदार लंके बोलत होते.

ते म्हणाले की, प्रा. शशिकांत गाडे सरांनी सांगितलं की, तुम्हाला फोन आला की काय ईडी-बिडीचा. पण, ते एवढं सोप्प काय. फोनबिन आपल्याला नाही. संघर्ष आपल्या पाठीशी पुजलेला आहे. ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना हा नीलेश लंके नडतो, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. मी एखाद्याच्या विरोधात गेलो, तर समोरच्याचा शेवट करतो, त्यामुळे लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. ईडीबिडीचे फोन हे विषय सोडून द्या हो. आपलं अख्खं आयुष्य संघर्षात गेले आहे.

लंके म्हणाले की, आजच्या सभेसाठी उपस्थित असलेल्या लोकांचा उत्साह पाहता, महाविकास आघाडीने दिलेल्या पॅनेलला लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असल्याचे स्पष्ट आहे. शेतकऱ्यांनी दाखविलेल्या या विश्वासामुळेच महाविकास आघाडीचे पॅनेल पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवून विरोधकांचा पराभव करण्यासाठी सज्ज झालेले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेले आपले उमेदवार त्यांच्या उद्धारासाठी सदैव प्रयत्नशील राहतील. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची अडवणूक होऊ नये, शेतकरी वर्गाचा विकास साधला जावा यासाठी ते कार्यरत राहतील. सध्याच्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांमुळे बाजार समितीच्या कारभारावरील शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. पारदर्शी व्यवहार करत शेतकऱ्यांचा विश्वास कमावणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. महाविकास आघाडीच्या आपल्या या पॅनलला बहुमताने विजयी करा, असे आवाहनही लंके यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT