Sangamner politics : "साहेब, आमचं काम बघा", "या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे", "फोन लावा, मदत पाहिजे", अशा अनेक कामांनी काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आजही घेरले गेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही न थांबलेले बाळासाहेब थोरात लोकांच्या कामांमध्ये गुंतून आहेत.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, पण त्यांच्यातील नेता, माणूस हरलेला नाही, हेच चित्र आजही त्यांच्या मतदारसंघात दिसते. जुने-जाणते आणि आजची तरुणाई, बाळासाहेब थोरातांच्या कामाचा झपाटा पाहून, 'आमचे बाळासाहेब लय जोरात', असे खासगीत म्हणतात.
निवडणुकीत पराभव झाल्यावर अनेक नेते, काही काळ विश्रांती घेतात. पण बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) याला अपवाद ठरलेत. पराभवानंतरही बाळासाहेबांचा कामाचा आवाका वाढला आहे. लोकांच्या अडचणी ऐकण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी त्यांचे 'यशोधन' कार्यालयावर नेहमीच मोठी गर्दी दिसते. कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आजही या कार्यालयात आपल्या अडचणी घेऊन येतात आणि त्यांना तितक्याच आपुलकीने उत्तर देत सोडवल्या जातात.
गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सुटत आहेत. शेतकरी (Farmers) आणि त्याच्या जमिनीसंदर्भात, पाणी प्रश्न, खतं-बियाणं, वीज जोडणी, सरकारी योजना, आरोग्यविषयक मदत, शैक्षणिक, असला कुठलाही विषय असो, "साहेब बघतील" हा विश्वास आजही जनतेच्या मनात आहे. म्हणूनच कोणतेही काम असो, थोरात यांना सर्वसामान्यांचा फोन होतोच, हे समीकरणच बनलं आहे.
मान्सून पूर्व पावसामुळे अनेक शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. बाळासाहेब थोरातांनी यावर प्रशासनाशी संपर्क साधत नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. कृषिमंत्री असताना, शेतकऱ्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत, आणि त्यावरील उपाय कसे करायचे, याची जाण असल्याने, अशा अस्मानी संकटात शेतकऱ्यांना नशिबावर सोडणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट मत बाळासाहेब थोरातांचे आहे.
थोरात यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती, शेतकी संघ, अमृतवाहिनी बँक यांसारख्या अनेक संस्था बळकट केल्या आहेत. त्या माध्यमातून आजही ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, व्यापारी वर्ग थेटपणे जोडले गेलेले आहेत. विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करून घेणं, यावर आजही बाळासाहेब थोरातांचं लक्ष असतं.
जनतेचा आवाज कुठेतरी दडपला जातो, तेव्हा थोरात तो आवाज बनून पुढे उभे राहतात. त्यामुळेच ते केवळ राजकारणी नाही, तर ती एक चळवळ आहेत. आजची परिस्थिती सांगते की, संगमनेरच्या राजकारणात सत्ता बदलू शकते, पण थोरात यांच्यावरील विश्वासाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पराभवानंतरही त्यांचा संयम, सातत्य, आणि कार्यतत्परता, हीच त्यांच्या खऱ्या नेतृत्वाची ओळख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.