Sangamner municipal elections : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधून काँग्रेस चिन्ह यावेळी गायब झालं आहे. बाळासाहेब थोरातांनी संगमनेर नगरपालिका निवडणुकीची सूत्र, त्यांचे भाचे नाशिक पदवधीरचे आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे सोपवलीत. त्यामुळे वेगळं चित्र संगमनेरच्या निवडणुकीत निर्माण झालं आहे.
सत्यजित तांबे यांच्या पत्नी डाॅ. मैथिली तांबे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. याच वेळी सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षाचं चिन्हं बाजूला सारून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाचं सिंह चिन्हं घेतलं आहे. थोरात अन् तांबे यांच्या या निर्णयामुळे संगमनेरची निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे.
संगमनेर (Sangamner) नगरपालिका निवडणुकीला समोरे जाताना, यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सर्व सूत्र आमदार सत्यजित तांबे यांच्या हाती सोपवली. सत्यजित तांबे यांनी नगरपालिका निवडणूक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून लढवण्याचं ठरवलं आहे. सत्यजित तांबे यांच्या पत्नी डाॅ. मैथिली तांबे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षातर्फे लढवत आहे. या पक्षाचे सिंह चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याचे तांबे यांनी देखील ठरवले आहे.
ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक पक्ष अन् त्या पक्षाच्या सिंह चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि सत्यजित तांबेंच्या निर्णयावर संगमनेरच्या गल्लीपासून ते राज्याच्या अन् देशाच्या काँग्रेस कमिटीपर्यंत पडसाद उमटले आहेत. या निर्णयावर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे चिन्ह सारून तुम्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी उडवून घेतली आहे का? यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, "जेव्हा अनेक पक्षांचे, अनेक विचारांचे, अनेक बिगर राजकीय लोकांनी समोर येऊन, मागच्या एक वर्षांमध्ये संगमनेरमध्ये जे राजकीय परिस्थिती निर्माण झाली, लोकांना त्रास होत होता, यावर लोकांनी असं ठरवलं की, राजकारणापलीकडे जाऊन राजकारणाच्या विचारांच्या पलीकडे जाऊन, आपण संगमनेरकर म्हणून एकत्र आलं पाहिजे, म्हणून आम्ही 'संगमनेर सेवा समिती' नावाने एक आघाडी उभी केली."
'परंतु निवडणूक आयोगाचे जे चिन्ह आहे, याबाबत काही धोरण आहेत, त्यात ते क्लिष्ट आणि किचकट, अशी धोरण आहेत, सव्वीस तारखेला चिन्हं मिळणार आणि एक तारखेला मतदान, चारच दिवस प्रचाराला मिळतात, ही बाब चिंताजनक होती. यानंतर आम्ही एका राष्ट्रीय पक्षाची मदत चिन्हाबाबत घेण्याचं ठरवलं, त्यामुळे आम्ही 'सिंह' हे चिन्ह घेतलं ते संगमनेरकरांना पूर्वीपासून परिचित आहे. या चिन्हा बरोबर संगमनेरकरांचे भावनिक नातं आहे, त्यामुळे या चिन्हाचा पक्ष असलेल्याची मदत आम्ही घेतली. सुदैवाने तो पक्ष देखील मोठा आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांची मदत घेण्यामध्ये वावगं काही नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांची मदत घेतली', असे सत्यजित तांबे यांनी म्हटले.
संगमनेरच्या या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा कितपत यश मिळवण, यावर सत्यजित तांबे म्हणाले, "ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. अनेक लोकांनी अनेक प्रकारचे प्रयोग, या तालुक्यात करून पाहिले. परंतु आज जी परिस्थिती आहे ते लोकांना कळून चुकलेले आहे की, या तालुक्याचा विकास कोणी केला आहे. या शहराला, तालुक्याला विकास देण्याचं काम कोण करत आहे आणि कोण विकास करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. मोठमोठ्या वल्गना करणं सोपं असतं. परंतु लोकांना शाश्वत विकास हवा असतो."
'सर्व पक्षाचे लोक आणि सर्व संगमनेरकर, 'संगमनेर सेवा समिती'मध्ये एकत्र आले आहेत, संगमनेरकर म्हणून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, असा प्रयोग काही पहिल्यांदाच झालेला नाही, 1996 साली, पण आम्ही अशीच आघाडी करून लढलो होतो आणि आता देखील तेच होत आहे. संपूर्ण मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब थोरात हेच काम पाहत आहेत,' असेही सत्यजित तांबे यांनी सांगितले.
संगमनेरमधून काँग्रेस चिन्ह गायब झालं आहे, यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, "जेव्हा अनेक पक्षाचे लोक, अनेक विचाराचे लोक एकत्र येतात, तेव्हा त्यावेळेस चिन्हाचा घोळ होण्याची शक्यता असते. इतर पक्षाचे लोक देखील आपापल्या पक्षाच्या चिन्हाचा आग्रह धरतात. राज्यात आताच्या निवडणुकीत अशी परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे की, तीन-तीन फॉर्म देण्यात आलेले आहेत. महायुतीमध्ये तीन-तीन फॉर्म देण्याचा प्रकार घडला आहे. संगमनेरमध्ये महायुतीने प्रत्येक प्रभागांमध्ये तीन-तीन फॉर्म दिले आहेत. महाविकास आघाडीने देखील तीन-तीन फॉर्म दिले आहे. यातून मतदारांचा संभ्रम होणार होता, ते टाळण्यासाठी जाहीर, एक चिन्ह घेऊन एकत्र निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहोत.
या निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा आरोप सुरू झाले आहेत. यावर बोलताना सत्यजित तांबे यांनी, घराणेशाहीचा मुद्दा हा निवडणुकीत असूच शकत नाही. कोणतंही क्षेत्र हे घराणेशाही पासून लांब राहिलेलं नाही. पत्रकारिता, सिनेमा, उद्योग व्यवसाय, नोकरी तसेच समाजकारण आणि राजकारण ही क्षेत्र देखील, असे आहेत की, अनेक समाजसेवकांचे मुलं देखील समाजसेवक होत आहेत. कीर्तनकारांची मुलं देखील कीर्तनकार होत आहेत. त्यामुळे घराणेशाही पासून कोणतेही क्षेत्र लांब राहिलेलं नाही. परंतु प्रस्थापित आणि घराणेशाहींच्या विरोधात भाषण करायचे, निवडणुका जिंकायच्या यानंतर काही महिन्यातच आपणच तो मुद्दा विसरायचा, ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक नव्हे का? अशा लोकांना जनता माफ करणार नाही, असे म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.