Mumbai News: विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज यांची छाननी काल झाली. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील ३५ पैकी १९ मतदार संघांमध्ये बंडखोरांनी आपले झेंडे फडकवले आहेत. बंडखोरांच्या या जाचाने अधिकृत उमेदवारांची झोप उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज यांची छाननी बुधवारी झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघात ३३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. २५ उमेदवार अपात्र ठरले. १५ मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे.
या बंडखोरांचा सर्वाधिक फटका शिस्तबद्ध पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजप आणि महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसला बसला आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना आता प्रचाराऐवजी या बंडखोरांचे बंड थंड करण्यासाठी आपली शक्ती खर्ची करावी लागत आहे.
एवढे प्रयत्न करूनही यातील बहुतांश बंडखोरांनी माघार घेण्यास सपशेल नकार दिला आहे. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील बंडखोऱ्यांना इशारा दिला आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हे सर्व उमेदवार आजच माघार घेतील, असे राज्याचे प्रभारी म्हणाले होते.
प्रत्यक्षात मात्र त्यांच्या या घोषणेनंतर बहुतांशी बंडखोरांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर करत थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले आहे. काँग्रेस पक्षाला बंडखोरीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
यामध्ये माजी आमदार निर्मला गावित (इगतपुरी), डॉ हेमलता पाटील आणि हनीफ बशीर (नाशिक मध्य), सुहास नाईक (शहादा), धुळे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शाम सनेर (शिंदखेडा), सचिन सोमवंशी (पाचोरा), के. डी. पाटील (अमळनेर), दारा मोहम्मद (रावेर) हे प्रमुख बंडखोर आहेत.
धुळे जिल्हा अध्यक्ष शाम सनेर यांनी लोकसभेत उमेदवारी न मिळाल्याने राजीनामा दिला होता. त्यांची समजूत काढल्यावर त्यांनी पक्षाचा प्रचार केला. मात्र विधानसभा निवडणुकीतही अन्याय झाल्याची त्यांची भावना आहे. इगतपुरी मतदार संघात पक्षाने अतिशय नवख्या उमेदवाराला उमेदवारी देत प्रबळ दावेदारी असलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांना डावलले. त्यामुळे गावित या अपक्ष उमेदवार आहेत.
काँग्रेस पक्षाची सबंध यंत्रणा सौ. गावित यांच्या सोबत आहे. नाशिक मध्य मतदारसंघातही माजी नगरसेविका पाटील यांची बंडखोरी सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. या बंडखोरांची समजूत घालण्यासाठी स्थानिक पदाधिकारी यशस्वी झालेले नाही.
पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भारतीय जनता पक्षालाही बंडखोरीची लागण झाली आहे. आठ मतदारसंघांमध्ये भाजपने दिलेल्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने रमेश थोरात (कळवण), हिना गावित (अक्कलकुवा), भरत गावित (नवापूर), अमोल शिंदे (पाचोरा), डॉ निळकंठ पाटील (पाचोरा), शिरीष चौधरी (अमळनेर), डॉ अश्विन सोनवणे (जळगाव शहर) आणि शशिकांत जाधव (नाशिक पश्चिम) हे प्रमुख बंडखोर आहेत.
चांदवड मतदार संघात विद्यमान आमदार डॉ आहेर यांच्या विरोधात त्यांचेच बंधू आणि नाफेडचे संचालक केदा आहेर यांनी बंडखोरी केली आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांविरुद्ध बंडखोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या बंडखोरांना माघारी घेण्यासाठी आता पुढील तीन दिवस पक्षाची यंत्रणा आणि अधिकृत उमेदवार यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप वाघ (पाचोरा), जगदीशचंद्र वळवी (चोपडा), डॉ चंद्रकांत बारेला (चोपडा), अशोक पवार (अमळनेर) हे बंडखोर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दीपक राजपूत (जामनेर), नानाभाऊ महाजन (पारोळा) आणि कुलभूषण पाटील (जळगाव शहर) हे बंडखोर आहेत.
यंदाच्या निवडणुकीत महायुतीचा घटक म्हणून नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मिळाले आहेत. मात्र महायुतीचाच घटक असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने अजित पवारांना धक्का देत अपशकुन केला आहे.
देवळालीत राजश्री अहिरराव आणि दिंडोरी येथे माजी आमदार धनराज महाले यांना शिंदे गटाने अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे खानदेशात बंडखोरीचे अमाप पीक आल्याचे स्पष्ट झाले. आहे ३५ पैकी १९ मतदार संघात बंडखोरांनी बंडाचा झेंडा फडकावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.