Ahmednagar Congress
Ahmednagar Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News: राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार?; नगर दक्षिण लोकसभेसह नगर शहर विधानसभा मतदारसंघावरही काँग्रेसचा दावा

सरकारनामा ब्यूरो

Political News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटप आणि उमेदवार चाचपणी निर्णयासंदर्भात काँग्रेसही अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरवात केली आहे.

काँग्रेसने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात सुरवात केली असून काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासह नगर शहर विधानसभेवरही दावा केला आहे.

नगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे. तसेच दक्षिणेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघदेखील काँग्रेसने आपल्याकडे घेतला पाहिजे, असे म्हणत लोकसभेसह शहर विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला. काँग्रेस नेत्यांसमोर तशी नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मागणी केली आहे.

गेल्या दोन टर्म म्हणजे 2014 आणि 2019 ला येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप निवडून आले. त्यापुर्वीही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आले आहेत. मात्र, आता काँग्रेसने नगर दक्षिण लोकसभेची जागा आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघही दावा केल्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

नगर दक्षिणेची जागा काँग्रेसकडे घेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना उमेदवार करावे, अशी मागणी यापूर्वीच शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर आता मुंबईतील बैठकीत राज्याच्या नेत्यांसमोर कार्यकर्त्यांच्या भावना पुन्हा मांडण्यात आल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, "दक्षिण लोकसभा काँग्रेस लढत नाही. दक्षिण नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकही जागा काँग्रेस लढत नाही. दक्षिणेमधील कार्यकर्त्यांना बळ द्यायचे असेल तर या विभागातून काँग्रेसचे किमान दोन आमदार असणे आवश्यक आहे. नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्ष संघटना अत्यंत ताकदीने काम करत आहे. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी किमान एक मतदारसंघ हा काँग्रेसकडे पक्षाने जागा वाटपात घेतला पाहिजे", अशी मागणी त्यांनी केली.

"दक्षिणेतून पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून येऊ शकतो. आजपर्यंत झालेल्या १८ लोकसभा निवडणुकांपैकी १२ वेळा काँग्रेसचा खासदार सुमारे ४६ वर्ष या मतदारसंघातून निवडून आला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक अपवाद वगळता ४ वेळा भाजपने या ठिकाणी नेतृत्व केले. त्यामुळे काँग्रेस हा मतदारसंघ निश्चितपणे जिंकू शकते. जागा वाटपाच्या वेळी हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेतला जावा", असं काळे म्हणाले. याबरोबरच ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी भूमिका मांडली.

शिर्डी मतदारसंघावरही दावा?

शिर्डी लोकसभा मतदारसंघावरही काँग्रेसने दावा केला आहे. शिर्डी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे. ठाकरे सेनेचे निवडून आलेले खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे सेनेत गेले आहेत. त्यामुळे सेनेकडे स्थानिक सक्षम उमेदवार नाही. उत्तरेत सहापैकी पाच आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. काँग्रेसने ही जागा लढवली पाहिजे. शिवसेनेकडे स्थानिक उमेदवार नसल्यामुळे आयात उमेदवारासाठी हा मतदारसंघ काँग्रेसने कदापिही सोडू नये, अशी मागणी उत्कर्षा रूपवते, करण ससाणे यांनी केली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT