rahul gandhi sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress News: काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी 10 दिवसांचा ‘ट्रेनिंग कॅम्प’; नाशिकमध्ये राहुल गांधींसह दिग्गज नेते करणार मार्गदर्शन

Congress district presidents training: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पक्षाची आगामी राजकीय दिशा, संघटनात्मक आव्हाने आणि पक्षाची विचारधारा यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी नाशिकमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा अध्यक्षांसाठी १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्षांच्या निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा एक भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पक्षाची आगामी राजकीय दिशा, संघटनात्मक आव्हाने आणि पक्षाची विचारधारा यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

पक्षाची दिशा आणि संघटनात्मक तयारीवर भर

प्रशिक्षणादरम्यान आगामी काळातील काँग्रेसची भूमिका, देशाच्या राजकारणातील पक्षाचे स्थान, बदलते राजकीय वातावरण आणि संघटन मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर विविध सत्रांमध्ये चर्चा होणार आहे.

नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि बदलत्या राजकीय परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन यांनाही या प्रशिक्षणात महत्त्व दिले जाणार आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि वरिष्ठ नेते प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत.

शशिकांत सेंथिल यांची तीन दिवस विशेष सत्रे

काँग्रेसच्या राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष आणि खासदार शशिकांत सेंथिल प्रशिक्षण शिबिरात तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही जिल्हाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील AICC प्रशिक्षण टीमकडे संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘नवी पिढी, नवे नेतृत्व, मजबूत संघटन’

‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या व्यापक संकल्पनेवर प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासोबतच जिल्हाध्यक्षांमध्ये संघटनात्मक कौशल्य, नेतृत्वक्षमता, वैचारिक स्पष्टता आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

मनरेगा कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणार

या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सभागृहातील चर्चेपुरते ते मर्यादित राहणार नाही. प्रशिक्षणार्थी दररोज श्रमदानात सहभागी होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील परिस्थिती आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मनरेगा अंतर्गत कामाचा अनुभव देण्यात येणार आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था, श्रम, संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन अडचणी यांचा जवळून अभ्यास करण्याची संधी प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे. काँग्रेसच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसाठी जिल्हाध्यक्षांची भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने या निवासी प्रशिक्षण शिबिराची रचना करण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT