Sangamner News : काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहिणी, आमदार सत्यजीत तांबे यांच्या आई आणि संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या एका वक्तव्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी तांबे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत, त्यांच्या विरोधात विधानसभेच्या विशेषाधिकाराचा (हक्कभंग) प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
वादाची पार्श्वभूमी संगमनेर (Sangamner) नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेशी संबंधित आहे. या योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाणार असल्याची घोषणा संबंधित राज्यमंत्र्यांनी सभागृहात केली आहे.
या घडामोडींनंतर दुर्गा तांबे यांनी प्रतिक्रिया देताना, संगमनेरची बदनामी करण्यासाठी विधानसभेसारखे पवित्र सभागृह "अपवित्र" करण्यात आल्याचा आरोप केला होता. याच वक्तव्यावर आक्षेप घेत शिवसेना (Shivsena) आमदार खताळ यांनी हा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित केला.
आमदार खताळ यांनी सभागृहात सादर केलेल्या निवेदनात संबंधितांविरुद्ध हक्कभंगाची कारवाई करून हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, हे वक्तव्य कोणत्याही एका सदस्याविरोधात किंवा राजकीय पक्षाविरोधात नसून महाराष्ट्र विधानसभेच्या संस्थात्मक प्रतिष्ठेवर आघात करणारे आहे.
लोकप्रतिनिधींचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या विधानसभेत राज्याच्या कायदे निर्मितीचे घटनात्मक कार्य पार पडते. अशा संस्थेला "अपवित्र" संबोधणे म्हणजे केवळ सभागृहाचाच नव्हे, तर राज्यातील कोट्यवधी मतदारांचाही अवमान असल्याचे खताळ यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच, अशा प्रकारच्या विधानांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात विधानसभेबाबत अवमानकारक भाषा वापरण्याला प्रोत्साहन मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे हा विषय केवळ राजकीय वाद म्हणून न पाहता, विधानसभेचा सन्मान, अधिकार आणि परंपरा कायम राखण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचारात घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले.
या प्रकरणावर दुर्गा तांबे किंवा काँग्रेसकडून पुढील भूमिका काय घेतली जाते आणि विशेषाधिकार समितीबाबत काय निर्णय होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.