Sudhir Tambe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhir Tambe News : काँग्रेसमधून निलंबित सुधीर तांबेंची लवकरच घरवापसी; पण ते मनमोकळेपणाने रुळतील का?

Maharashtra Politics : काँग्रेसकडून मिळालेल्या वागणुकीचे शल्य तांबे पिता-पुत्रांच्या मनात कोठेतरी घर करून आहे.

Mangesh Mahale

Nagar : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रात कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीविषयी वेगवेगळे सव्हे समोर येत आहेत. काँग्रेसला तसेच महाविकास आघाडीला सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे जुने-जाणते पुन्हा पक्ष संघटनेत सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे पुन्हा लवकरच सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. डाॅ. तांबे हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असून, त्यांच्याकडे पक्षात मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. परंतु नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी काँग्रेसकडून मिळालेल्या वागणुकीचे शल्य तांबे पिता-पुत्रांच्या मनात कोठेतरी घर करून आहे. त्यामुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले तरी ते मनमोकळेपणाने रुळतील का? अशीही चर्चा आहे.

लोकसभेची जोरदार तयारी...

नाशिक पदवीधर निवडणुकीत सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेत त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले. यामुळे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सत्यजित तांबे पुढे निवडणुकीत विजयी झाले. सत्यजित तांबे हे काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सुधीर तांबे हे आता पक्षातून निलंबित आहेत, तर आमदार सत्यजित तांबे हे अपक्ष निवडून आल्याने ते काँग्रेस पक्षाबाहेर आहेत आणि त्यांच्यावर भाजपचा डोळा आहे. काँग्रेसकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ दिले जात आहे.

पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी?

सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र आमदार सत्यजित तांबे यांनादेखील पक्षापासून अजून जास्त काळ दूर ठेवता येणार हे पक्षश्रेष्ठींनी ओळखले आहे. थोरात आणि तांबे परिवार नेहमीच काँग्रेसबरोबर राहिला आहे. सत्यजित तांबे यांनीदेखील विजयानंतर काँग्रेसकडे येणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाईनंतरदेखील ते शांत राहिले. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ते आजही सहभागी होताना दिसत आहेत. परंतु पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून काही सापडलेला नाही.

सुधीर तांबे यांच्याशी याबाबत संपर्क साधल्यावर म्हणाले, "पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहे. लवकरच दिल्लीला जाणार आहे. कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो". राज्यात लोकसभेसाठी काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा असतील. पक्ष जी जबाबदारी देईल, तिथे काम करण्याची तयारी आहे, असेही सुधीर तांबे म्हणाले.

पिता-पुत्रांना चांगले दिवस असतील का?

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर तांबे पिता-पुत्र काँग्रेसपासून लांब आहेत. याला बराच कालावधी गेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बाळासाहोब थोरात यांच्याशी पक्षांतर्गत असलेली स्पर्धा सर्वश्रुत आहे. निवडणुकीवेळी तांबे पिता-पुत्रांना मिळालेली वागणूक आणि सत्यजित तांबे यांनी एबी फाॅर्म संदर्भात केलेले आरोप, हा इतिहास पहिल्यावर तांबे पिता-पुत्रांना काँग्रेसमध्ये पुन्हा चांगले दिवस असतील का? अशीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT