Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान किती?

बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका केली.

Sampat Devgire

नाशिक : देशासाठी (India) काँग्रेसने (Congress) काय केले, असा प्रश्‍न विचारणाऱ्या भाजपने (BJP) देशाची आजपर्यंतची प्रगती कुणामुळे झाली याचा इतिहास जरा चाळावा. भाजपकडून सध्या काँग्रेसविषयी अपप्रचार केला जात आहे, मात्र ज्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे, त्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) योगदान काय आहे हे जनतेला सांगावे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज येथे केली. (Atpresent BJP starta drive of missleading people on Congress)

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेसतर्फे ९ ते १५ ऑगस्टदरम्यान क्रांतिवीरांच्या स्मरणार्थ ‘आजादी गौरव पदयात्रे’चे आयोजन केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात निघणाऱ्या या पदयात्रेच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज येथे पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते.

भाजप सरकारला भडकलेली महागाई, बेरोजगारी अशी लोकोपयोगी कामे करण्यापेक्षा सुडाचे राजकारण करण्यातच अधिक रस आहे. ईडी आणि इतर यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सरकारने वेगवेगळे दिन पाळण्यापेक्षा जनतेच्या रोजच्या जीवनमरणाचा प्रश्‍न बनलेला महागाई दिन पाळावा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

श्री. थोरात यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना प्रचंड भाववाढ झाल्याकडे लक्ष वेधले. खाद्यपदार्थांवरील जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाल्याचेही सांगत जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडेही जरा बघावे, असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. श्री. थोरात यांनी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील नंदुरबार येथील शिरीषकुमारचे हौतात्म्य, १९३६ ला फैजपूर येथील काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन याचा मागोवा घेत नगर येथील भुईकोट किल्ल्यात या पदयात्रेचा समारोप होणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांना जाणिवेसाठी

परकीय राजवटीत काँग्रेसने अहिंसा, असहकार, सत्याग्रहाद्वारे एक संस्कृती निर्माण केली. स्वातंत्र्यानंतर शिक्षण, औद्योगिकीकरणातही पक्षाने मोठी झेप घेतल्याकडे श्री. थोरात यांनी लक्ष वेधले. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला प्रगतिपथावर नेले; परंतु सद्याच्या भाजप सरकारने जनतेचे जगणे अवघड केल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांना याची जाणीव करून देणे हाच या देशव्यापी पदयात्रेचा उद्देश असल्याचे आ. थोरात यांनी सांगितले.

कारभार सचिवालयातून

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला ओळख मिळालेली नाही, तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचा गौरव वाढविल्याचे त्यांनी सांगितले. महिन्यानंतरही मंत्रिमंडळ तयार होत नसल्याने दोन जणांच्या या सरकारला मंत्रालयातून नव्हे, तर सचिवालयातून कारभार करण्यात स्वारस्य असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT