PI Kirankumar Bakale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

PI Bakale: बकालेंकडून मराठाच नव्हे, अन्य समाजांबद्दलही आक्षेपार्ह टिपणी?

उचलबांगडीनंतर निरीक्षक बकालेंच्या वक्तव्याचे अनेक किस्से चर्चेत आल्याचे बोलले जाते.

Sampat Devgire

जळगाव : मराठा (Maratha) समाजाबाबत आक्षेपार्ह (Offensive) वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने निलंबनाची (Suspension) कारवाई झालेल्या पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) यांनी केवळ मराठा समाजच नव्हे तर अन्य समाजांबद्दलही वेळोवेळी गरळ ओकल्याचे बोलले जात आहे. त्यासंदर्भातील किस्से आता एकेक करून समोर येत आहेत. (Various stories coming in disputation about PI Kirankumar Bakale)

बकालेंच्या खुर्चीला सुरुंग लावणाऱ्यांकडे त्यांच्या विरुद्ध आणखी मसाला असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. योग्य वेळी एकामागून एक पुरावे समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव जिल्‍हा पोलिस दलातील सर्वांत महत्वाचे पद असलेल्या स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आपल्या हजेरी मास्तरशी बोलताना जे वक्तव्य केलं त्याच्या ऑडिओ क्लिप मुंबईपर्यंत पोचल्यावर मराठा समाजात एकूणच संतापाची लाट उसळली.

बकालेंच्या या कारनाम्यामुळे अनभिज्ञ असलेल्या एलसीबीसह मुख्यालय आणि सर्वच पेालिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने रोष व्यक्त करण्यास सुरवात केली. या रोषातूनच बकालेंच्या कारकिर्दीचे किस्से आणि सुरस कथा बाहेर येवू लागल्या आहेत.

गैरफायद्याची युक्ती फसली

गुन्हेशाखेत डिटेक्शनमध्ये आजही मराठा, राजपूत समाजातील कर्मचारी अव्वलस्थानी आहेत. त्यांच्यासोबतच त्यांच्यात गटबाजी देखील आहे. हा त्या, गटाचा तो, त्या गटाचा यावरुन अनेक वेळा वादही झाले आहेत. याच वादाचा गैरफायदा घेत, ‘फूट डालो राज करो..’चा फॉम्युला बकालेंनी अवलंबल्याचे बोलले जाते.

ताब्यातच न येणाऱ्या पैलवान कर्मचाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवत त्याच्या विरोधी गटाच्या कर्मचाऱ्यास तक्रार करण्यासाठी दबाव आणला गेला असे कळते. मात्र, हा डाव इथंच फसला. संबंधित कर्मचाऱ्याला कळताच त्याने सावधगिरीसह संयम ठेवला. अन्‌ बकालेंची वादग्रस्त क्लिप त्याच्या हाती लागताच त्यांच्या खुर्चीला सुरुंग लागला. तो, असा की आता खात्यातून बडतर्फीच अंतिम निर्णय राहणार आहे.

किस्से अन्‌ कथांचे कारनामे

मराठा समाजाबाबत बोलल्याच्या क्लिप ऐकल्यानंतर अशा अनेक ऑडिओ- व्हिडिओ क्लिप अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे. त्यात वर्ण व्यवस्थेसह विवीध समाज घटक, समुदाय, जाती-धर्म आणि त्यांचे शास्त्रोक्त डीएनए बाबत बकाले आपले ज्ञान पाजळताना आपण ऐकू शकाल असा दावा केला जात आहे. तर, बकालेंच्या मैत्रीत असलेल्यापैकी कुणी वकिली करत असेल तर त्याचा इलाजही बाबा बकालेंनी सांगून ठेवल्याचे बोलले जात आहे.

ठंडा सोबतच ‘गरम’ मसालाही

बकालेंच्या त्या वक्तव्याच्या आधीपासून हे सर्व घडत असताना जातीवर किळसवाणी टिप्पणी केल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटल्याचे कळते. काही झालं तरी, माघार नाहीच म्हणत हत्त्यार उपसलं गेलं आणि त्याचा परिणाम संपूर्ण बकाले प्रकरण महाराष्ट्रात चर्चेत आहे. पोलिस खात्याची इभ्रत चव्हाट्यावर येऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा असल्याने यावरील पुढच्या आवृत्त्या तूर्तास तरी फक्त ‘फोडणीवरच’ थांबवण्यात आल्या आहेत. कारवाईत कुचराई झाली तर..‘गरम’ मसाल्याचा तडकाही तयार असल्याचे सांगितले जात आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT