Education Department Maharashtra : राज्यातील टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. युवक काँग्रेसने मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली असून, खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टद्वारे शालेय शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर (Education Department) टीका करत राज्यातील सुमारे 2,000 सरकारी शाळा निधीअभावी बंद पडल्याचा दावा केला. तसेच विद्यापीठे आणि शालेय मंडळांमध्ये बनावट पदव्या व गुणपत्रिकांचा बाजार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी शालेय शिक्षणमंत्री कार्यालयातील कथित आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आरोप करत एक 'रेट कार्ड' सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्या दाव्यानुसार, स्वयंअर्थसहाय्यित शाळांना अंतिम मंत्रीमान्यता मिळवण्यासाठी 5 ते 10 लाखांची मागणी केली जाते. तसेच शाळेच्या तुकडी वाढीसाठी 8 लाख, तर इरादापत्र मंजुरीसाठी 5 लाख द्यावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राऊत यांच्या पोस्टनुसार, कथितपणे पैसे दिल्यानंतरही संस्था चालकांना सहा-सहा महिने मंत्री कार्यालयाचे फेरे मारावे लागत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांनी, "मी मंत्री महोदयांचा पाहुणा असल्याने मला कोणी काही करू शकत नाही," अशा प्रकारचा अविर्भाव संबंधित ओएसडीकडे असल्याचेही आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
संस्था चालकांना शाळा सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यात विविध प्रशासकीय मंजुरींसाठी सुमारे 50 लाखांपर्यंत खर्च होत असल्याचा दावा करत, या व्यवस्थेमुळे शिक्षण क्षेत्रातील संस्थाचालक अडचणीत आल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.
शाळांच्या मान्यतेसाठी कथित आर्थिक व्यवहारांचे रेट कार्ड शेअर करत, या प्रकरणासंदर्भात लवकरच व्हिडिओसह अधिक माहिती समोर आणणार असल्याचा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. खासदार राऊत यांनी केलेले आरोप आहेत. या आरोपांवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.