

Badlapur illegal school : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शिरगाव येथील नारायणा स्कूलविरोधात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. आवश्यक शासकीय मान्यता न घेता शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, गुन्हा दाखल होऊन दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही शाळा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांनी बदलापूर पूर्व पोलिस (Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, आवश्यक परवानगी आणि मान्यता नसतानाही शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यात आले होते.
यापूर्वी शिक्षण विभागाने या शाळेला (School) अनधिकृत घोषित करून ती तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच पालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून शाळेच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक लावून या शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले होते.
गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांच्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संस्थेवर एक लाख रुपयांचा दंड तसेच प्रतिदिन 10 हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या सर्व कारवाईनंतरही शाळेचे कामकाज सुरू असल्याचे समोर आल्याने शिक्षण विभागाच्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सध्या या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे 538 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक व्यवस्थेबाबत माध्यमांनी विचारणा केली असता शाळा प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
या पार्श्वभूमीवर पालक आणि स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, शाळेविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. राज्यातील अनधिकृत शाळांवर शिक्षण विभाग पुढे कोणती भूमिका घेतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.