Ramgiri Maharaj & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse Politics: दादा भुसे यांनी रामगिरी यांच्या वक्तव्याबाबत झटकले हात!

Dada Bhuse Politics, Minister Bhuse kept himself away from Ramgiri Maharaj's Controversial statement-कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक वक्तव्य करताना समाज मनाचे भान ठेवायला हवे

Sampat Devgire

Dada Bhuse News: रामगिरी महाराज यांनी पंचाळे (सिन्नर) येथे वादग्रस्त वक्तव्य केले. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यामुळे अनेक अर्थ लावण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत.

या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी आपले मत व्यक्त केले. यासंदर्भात बोलताना त्यांनी रामगिरी महाराज यांच्या विधानाबाबत आपले हात झटकले. त्या विधानापासून अलिप्त असल्याचा संदेश त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर देखील मुख्यमंत्री रामगिरी महाराज यांच्या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी साधुसंतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे विधान केले. हे विधान एक प्रकारे पोलिसांनी काय कारवाई करावी आणि कशी करावी याबाबतची अप्रत्यक्ष सूचनाच होती. त्यामुळे मुख्यमंत्री रामगिरी महाराज यांच्या मताला अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा तर व्यक्त करीत नाही ना? अशी चर्चा सुरू झाली होती.

या संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी मात्र या चर्चा व आरोपांना सपशेल नाकारले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा कार्यक्रम एक महिन्यापूर्वीच ठरलेला होता. त्या नियोजित कार्यक्रमांनुसार मुख्यमंत्री उपस्थित राहिले, असे दादा भुसे म्हणाले.

रामगिरी महाराज यांनी काय वक्तव्य केले? हा त्यांचा प्रश्न आहे. कोणत्याही समाजाविषयी वक्तव्य करताना प्रत्येकाने भान बाळगले पाहिजे, या शब्दात त्यांनी अप्रत्यक्षरीत्या रामगिरी महाराज यांचे कान टोचले.

प्रत्येकाला राज्यघटनेने भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार लोक व्यक्त होत असतात. मात्र त्याचा गैरवापर होता कामा नये. कोणीही असा गैरप्रकार केल्यास त्याची जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागेल. रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केले आहे. त्याबाबत ते स्वतःच योग्य तो खुलासा करतील, असे ते म्हणाले.

सरला बेट (कोपरगाव) येथील रामगिरी महाराज यांच्याकडे अनेक राजकीय नेते भेटीसाठी येत असतात. याबाबत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःच कबुली दिली आहे. आपण अनेकदा रामगिरी महाराज यांची भेट घेतली आहे, असे ते म्हणाले.

रामगिरी महाराज उपस्थित राहिलेल्या पंचाळे येथील हरिनाम सप्ताहाला सुद्धा व्यासपीठावर विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. याचवेळी सकल हिंदू समाजाचे बांगलादेशातील घटनांच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता. हा बंद आणि रामगिरी महाराज यांचे वक्तव्य हा योगायोग की, त्यात काही संबंध आहे हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.

रामगिरी महाराज यांनी देखील यावर मोजक्या शब्दातच प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस रामगिरी महाराज यांच्या विरोधातील आंदोलन पोलिसांच्या कारवाईबाबतची उत्सुकता आणि या वक्तव्यावरील वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे.

विविध राजकीय नेत्यांनी व्यासपीठावर हजेरी लावली. तरी तेथून बाहेर पडल्यावर किती लोक रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ उभे राहतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT