Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse Politics : राज ठाकरेंची समजूत काढायला गेलेले मंत्री दादा भुसे एकाकी; 'हिंदी'च्या मुद्यावर चलबिचल

Dada Bhuse Hindi Implementation : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या आग्रहासाठी पुढील आठवड्यात सर्व विरोधी पक्ष एक वाटणार आहेत. हिंदी भाषेचा शालेय शिक्षणात पहिलीपासून समाविष्ट करण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे.

Roshan More

Dada Bhuse News: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला होत असलेल्या विरोधामुळे आता सरकार बॅकफूटवर गेले आहे. आता त्यांची बाजू लढविण्याची जबाबदारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर आली आहे.

भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना हिंदीची अंमलबजावणी पहिलीपासून कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न सपशेल फसला. राज यांनी हिंदीला विरोध असल्याचे स्पष्टच सांगितले. त्यामुळे भुसे यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

मंत्री भुसे हे शनिवारी नाशिकला होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांना फोन आला अन् त्यानंतर मंत्री भुसे पत्रकारांशी संवाद साधताना फारसे उत्साही दिसले नाहीत. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री म्हणून हिंदीची, सरकारची बाजू भुसे एकटे लावून धरत आहेत. या मुद्यावर ते एकाकी पडत असल्याच्या चर्चा आहेत.

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या आग्रहासाठी पुढील आठवड्यात सर्व विरोधी पक्ष एक वाटणार आहेत. हिंदी भाषेचा शालेय शिक्षणात पहिलीपासून समाविष्ट करण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यापासून अनेक मंत्र्यांनी हिंदीला उघडपणे विरोध केला आहे. अशा स्थितीत दादा भुसे हिंदीची बाजू लावून धरताना तेथेही एकाकी पडद्याची भीती आहे.

हिंदी भाषेला विरोध म्हणून राज्यातील सर्व भाषातज्ज्ञ आणि विरोधी पक्ष एकवटले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यानिमित्त एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंची एकता महायुती सरकारला हादरा देऊ शकते. त्यामुळे राज्य सरकार सध्या अस्वस्थ आहे. या पार्श्वभूमीवर हिंदीची बाजू लावून धरण्याची जबाबदारी मंत्री भुसे एकट्याने लढवत आहे.

हिंदी ऐच्छिक भाषा म्हणून अभ्यासक्रमात घेण्याचे समर्थन त्यांनी केले. हे समर्थन करताना त्यांनी अनेक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र राज ठाकरे यांनी जाहीरपणे भुसे यांचे केलेले वस्त्रहरण याबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले.

हिंदीची सक्ती नव्हे ऐच्छिक...

हिंदी आणि इंग्रजी भाषा सक्ती करणारा अहवाल डॉ रघुनाथ माशेलकर आणि 18 सदस्यांच्या समितीने घेतला होता. 27 जानेवारी 2022 ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तो स्वीकारला. यावेळी मी तसेच छगन भुजबळ आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. आम्ही मात्र सक्ती ऐवजी हिंदी भाषा ऐच्छिक केली आहे, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मराठी, शिवसेनेवर बोलणे टाळले

एकनाथ शिंदेंची शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगते. खरी शिवसेना आपल्याकडे असल्याचे शिंदे सांगतात. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यासाठी संघर्ष केला आहे. मुंबई मराठी माणसाची या विचारावर शिवसेना उभी राहिली आणि विस्तारली. मात्र या मुद्यावर दादा भुसे यांनी बोलणे टाळले.

दादा भुसेंची चलबिचल?

राज्यभरात हिंदी भाषा शालेय शिक्षणात समाविष्ट करणे हा भाजपचा राजकीय अजेंडा असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांना शिक्षण मंत्री म्हणून राज्य शासनाच्या धोरणाचे समर्थन करणे क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टीने ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र तात्विकदृष्ट्या हिंदी आणि मराठी याबाबत त्यांच्या मनातही चलबिचल तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT