
Sangli News : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रखडलेल्या स्थानिकच्या निवडणुकीचे दरवाजे उघडले आहेत. राजकीय पक्षांसह इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली असून हेवे दावे आता सुरू झाले आहेत. अशातच सांगलीत निवडणुकीच्या आधीच महापौर पदावरून भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. येथे भाजपची सत्ता होती. यातच वैभव पाटील आणि महापालिकेतील सर्वात मोठा गट असणाऱ्या मदनभाऊ पाटील गट देखील भाजपला मिळाल्याने आता भाजपला एकहाती सत्ता मिळवण्याची संधी चालून आली आहे. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट महापौर पदावर हक्क सांगितला आहे. यावरून निवडणुकीच्या आधीच रण तापले असून खडाजंगी होताना पहायला मिळत आहे. (BJP and NCP face off over Sangli mayor post ahead of local body elections as Hasan Mushrif claims leadership)
महापालिका निवडणुकीला अद्याप काहीसा अवधी आहे. निवडणूका प्रभाग रचनेमुळे नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. आता प्रभाग रचनेच्या कामालाही गती आली असतानात राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. यातच काँग्रेसला धक्का देत बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपला (BJP) जवळ केल्याने भाजपची पालिकेत ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील, आमदार इद्रीस नायकवडी आणि जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश घडवून आणत आहेत. यामुळे भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने आले असतानाच आता आमदार नायकवडी आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी महापौर आमचाच असा दावा केला आहे. यात जमेची फक्त एक बाजू म्हणजे मुश्रीफ यांनी पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असं सांगितलं आहे.
पण अद्याप निवडणुकीत महायुती म्हणून समोर जायचं की स्वतंत्रपणे लढायचं याचा अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र तिन्ही पक्षांची धडपडही पक्षीय ताकद वाढण्याकडे आहे. आतातर जयश्री पाटील यांच्यासह काही नेते भाजपमध्ये गेल्याने आणि काही माजी नगरसेवक लाईनीत असल्याने भाजपची ताकद वाढली आहे. भाजपकडून स्वबळाची घोषणा झाल्यास त्यात आश्चर्य व्यक्त करण्यासारखे काही नसेल. यामुळे सांगलीत ताकद वाढणाऱ्या राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतला आहे. तशा हालचाली गतिमान केल्या असून महापौर पदावर हक्क सांगितला आहे.
काँग्रेसमध्ये अन्याय झाला असा आरोप करणाऱ्या जयश्री पाटील पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या वाटेवर होत्या. पण ऐन वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समित कदम हे हुकमी पत्ता बाहेर काढले आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा गेम केला. समित कदम आणि भाजप जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी जयश्रीताईंचा प्रवेश घडवून आणला.
यामुळे सांगली महापालिकेतील सत्तासमिकरणाची गणिती बिघडली. तेच जर जयश्री पाटील राष्ट्रवादीत गेल्या असत्या तर राष्ट्रवादीची ताकद वाढली असती. पण आता त्या भाजपवाशी झाल्याने महायुतीत भाजपचं मोठा भाऊ झाला आहे. पण वातावरण निर्मिती होत असतानाच राष्ट्रवादीने महापौरपदावर हक्क सांगितल्याने मित्र पक्षाची कुरघोडी होत असल्याचे समोर आले आहे. आता ही कुरघोडी भाजपकसे थोपवणार हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.