Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon District Bank Election : नगरनंतर जळगावातही राष्ट्रवादीला धक्का : जिल्हा बॅंक निवडणुकीत अधिकृत उमेदवाराचा पराभव

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अर्थात माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे एका मताने निवडून आले आहेत. त्यांना शिवसेनेचे शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपचे समर्थन मिळाल्याचे सांगितले जात आहे. अहमदनगरनंतर जळगावातही बहुमत हाती असूनही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. (Defeat of official candidate of NCP for Jalgaon district bank election)

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी आज सकाळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात रवींद्र पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवार जाहीर करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवारही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाकडून अमोल चिमणराव पाटील यांना संधी देण्यात आली होती.

राष्ट्रवादीत उमेदवारीवरून एकमत न झाल्याने अखेर निवडणूक घेण्यात आली. त्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांना १० मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांना ११ मते मिळाली. एक जादा मत घेत संजय पवार यांनी अध्यक्षपदासाठी बाजी मारली. प्रत्यक्षात महाविकास आघाडीकडे बहुमत होते. तरीही रवींद्र पाटील यांचा पराभव झाला. पाटील यांची उमेदवारी खडसे यांनी जाहीर केली होती, त्यामुळे खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिंदे गट यांनी एकत्र येत खडसेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे दिसून आले. त्यांना ठाकरे गटाच्या एका संचालकाची मदत मिळाल्याची चर्चा आहे. त्याला अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीची मते फुटल्याचे उघड असून बहुमत पाठीशी असूनही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे नगरपाठोपाठ जळगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT