Ajit Pawar- Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचा अजित पवारांना धक्का, आघाडीच्या उमेदवाराला दिली साथ !

Sampat Devgire

Narhari Zirwal News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी आत्तापासूनच विधानसभेत काय घडेल याचे संकेत दिले आहेत. झिरवाळ यांनी यापूर्वी घेतलेल्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमुळे ते सातत्याने चर्चेत असतात. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता झिरवाळ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारावा साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेत्यांची भूमिका चर्चेचा विषय झाली आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या आमदारांची. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी या निवडणुकीत महायुतीला टाटा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अर्थात महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांना झिरवाळ यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. गुळवे यांच्या प्रचारात ते सक्रिय सहभागी होणार आहेत.

झिरवाळ यांनी गुळवे यांच्या कुटुंबाशी व्यक्तिगत संपर्क असल्याने आपण ही भूमिका घेतल्याचे म्हटले आहे. मात्र राजकारणात व्यक्तिगत संबंधांपेक्षा पक्ष आणि त्याचे विचार महत्त्वाचे मानले जातात. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून (BJP) आक्षेप घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून महायुतीत खदखद आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशावेळी झिरवाळ यांनी ही वेगळी वाट निवडली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय चित्र होईल याचा अंदाज कार्यकर्ते लावत आहेत.

महायुतीच्या अनेक आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात आहेत, असे आघाडीचे नेते सातत्याने सांगत आहेत. त्याला दुजोरा मिळणाऱ्या घटना सध्या घडत आहेत. नेत्यांचे वर्तनही त्याला साजेशेच आहे. त्यामुळे आमदार झिरवाळ यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत काय भूमिका घेतात, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT