NCP MLA Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics: देवळालीत 'गद्दारांना' फटका; विधानसभेसाठी अहिरेंसमोर 'एक अनार तीन बिमार'चे आव्हान

Sampat Devgire

NCP MLA Saroj Ahire: लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना देवळालीत मोठा फटका बसला. येथे ठाकरे गटाने २७ हजारांचे मताधिक्य घेतले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथे मोठ्या फेर बदलाचे संकेत आहेत.

विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांना 84,326 तर शिवसेनेचे योगेश घोलप यांना 42, 624 मते होती. विधानसभेचे 41,702 मताधिक्य मोडून लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने येथे 27 हजारांची आघाडी घेतली आहे.

देवळाली हा सध्या शिंदे गटात गेलेले माजी मंत्री बबन घोलप, माजी खासदार हेमंत गोडसे आणि शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा मतदारसंघ आहे. सध्या येथे अजित पवार गटाच्या सरोज अहिरे आमदार आहेत. आगामी निवडणुकीत आमदार अहिरे यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. उमेदवारी कोणाकडून घ्यावी हा प्रश्न आहे. मतदार स्वीकारतील का? हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आमदार अहिरे यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे.

अजित पवार गटातून शरद पवार गटाच्या संपर्कात असलेल्या आमदारांमध्ये सरोज अहिरे असल्याचे बोलले जाते. मात्र त्यांच्या प्रवेशाला पदाधिकाऱ्यांचा मोठा विरोध असेल. अशा स्थितीत महायुतीची उमेदवारी मिळाली तर भाजपचे पदाधिकारी काम करतील का? असा प्रश्न आहे.

भाजपने येथे अनेकांना उमेदवारीचा शब्द देऊन कामाला लावले आहे. यामध्ये माजी मंत्री घोलप यांच्या कन्या तनुजा भोईर, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रीतम आढाव आणि खास निवडणुकीसाठी राजीनामा दिलेल्या तहसीलदार राजश्री अहिरराव या तिघींनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. उमेदवारी न मिळाल्यास त्या काय करतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असल्याने देवळाली मतदारसंघ शरद पवार गटाला जाईल. त्यांच्याकडे लक्ष्मण मंडले तसेच माजी आमदार योगेश घोलप यांसह अन्य काही इच्छुक आहेत.

शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूती असल्याने देवळालीची जागा पुन्हा एकदा महाविकास आघाडीसाठी अनुकूल बनली आहे. अशा स्थितीत पक्षांतर केल्याने आमदार अहिरे यांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे. लोकसभा इफेक्ट आणि पक्षांतराची झळ येत्या निवडणुकीत त्यांना बसेल असे स्पष्ट संकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT