Devendra Fadnavis | Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही अजित पवारांचे वावडे?

BJP Forget to Mention Alliance Member Ajit Pawar on Hoardings: लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराच्या फलकांमधून उपमुख्यमंत्री अजित पवार झाले गायब.

Sampat Devgire

Devendra Fadnavis News: महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना येत्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा आधार वाटू लागला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी योजना आमचीच अशा थाटात राज्यभर प्रचार मोहीम हाती घेतली आहे.

या संदर्भात नाशिकमध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडकी बहीण योजनेचे फलक झळकले आहेत. `देवा भाऊ` असे संबोधित करीत लाडकी बहीण योजना आणि तिला मिळणारे अनुदान याची स्तुती करणारे हे फलक आहेत.

मात्र हे फलक वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांना हे फलक चांगलेच खटकले आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी तर यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या चिन्हासह उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे फलक लावले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब आहे.

वस्तूत: लाडकी बहिण योजना कोणाची यावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्येच श्रेय घेण्यासाठी खटाटोप आणि वादविवाद झाल्याचे लपून राहिलेले नाही. प्रारंभी ही योजना आपलीच अशा थाटात अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर मोहीम राबविली.

त्यांच्या या संवाद मोहिमेत प्रामुख्याने महिला मतदारांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यांच्या पक्षाचा हा कार्यक्रम होता त्यात त्यांनी गुलाबी रंगाच्या जॅकेटसह आपल्या वाहनांनाही गुलाबी रंग दिला होता. तो टिकेचा विषय देखील होता.

मात्र त्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचीही छायाचित्रे होती. भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेल्या सध्याच्या प्रचार मोहिमेत उपमुख्यमंत्री पवार यांचा त्यांना विसर पडलेला आहे. हा विसर जाणीवपूर्वक पडला की, अनावधानाने हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

लाडकी बहीण ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे. त्यावर मोठा खर्च होत आहे. राज्यभरातून सुमारे दीड कोटी महिला त्यात सहभागी होतील, अशा अपेक्षा आहेत. या सर्व महिला म्हणजे आपले मतदार असा महायुतीचा प्रयास असेल.

गेले काही दिवस उपमुख्यमंत्री पवार आणि महायुतीचे अन्य दोन्ही घटक पक्ष यांच्यात सर्व काही अलबेला नाही, असा संदेश जात आहे. काही घटकांकडून त्याबाबत जाणीवपूर्वक बातम्या देखील दिल्या जातात. त्यात राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी केलेली विधाने कारणीभूत ठरली आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवरच दोन दिवसांपूर्वी झळकलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलकाने नवी भर पडते की काय अशी स्थिती आहे. शहरात अनेक ठिकाणी हे फलक लावले आहेत. अंतिमतः लाडकी बहीण योजना राज्य सरकारची आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एक प्रमुख घटक आहे. त्याचे वावडे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT