Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BHR Corruption News: फडणवीसांच्या पेन ड्राईव्हची कारवाई चाळीसगावात!

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) बीएचआर अपहारातील संशयित सुनील झंवर (Sunil Zanvar) याच्या जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देत एक कोटी २२ लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात (Pune) गुन्हा दाखल झाला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत याबाबत पेन ड्राईव्ह दिला होता. त्यावर आता चाळीसगाव पोलिस (Police) कारवाई करणार आहेत. (Police transfers BHR extortion case of Sunil Zanwar to Chalisgaon police)

तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, (Pravin Chavan) लेखापरीक्षक शेखर सोनाळकर आणि मद्यव्यवसायिक उदय पवार यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचे घटनास्थळ चाळीसगाव असल्याने गुन्हा चाळीसगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल १ कोटी २२ लाख खंडणीच्या गुन्ह्यांचा सर्व घटना या जळगाव जिल्ह्यात घडलेल्या आहेत. परिणामी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी तो शून्य क्रमांकाने जळगाव पोलिसांकडे हस्तांतरित केला आहे.

दुसरीकडे भाईचंद हिराचंद मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी (बीएचआर) मध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाबाबत सूरज झंवर यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. त्यात अनेक गोष्टी पोलिसांनी अधिकाराच्या बाहेर जाऊन केल्याचे नमूद असून त्याचा तपास सीआयडीतर्फे करण्यात आला होता असा संयुक्त अहवाल गृह विभागाला सादर करण्यात येत आहे.

विधानसभेत धुराळा अन्‌ राजीनामा

पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बीएचआरमधील गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १९ संशयीतांना अटक केली होती. त्यात अटकेनुसार वेगवेगळ्या ४ वेळी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या सर्व १९ संशयितांची जामिनावर मुक्तता झाली आहे. चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.

विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण पोलिस अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून पदाचा गैरवापर करतात असा, असा आरोप करून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (९ मार्च २२) विधानसभेत धुरळा उडवला होता. त्यानंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. त्याच वेळेस सूरज झवर याने उदय पवार यांना संपर्क करून दिलेली रक्कम परत मागितली.

तिघांच्या अटकेची दाट शक्यता

सूरज झंवर यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहरातील उदय पवार यांच्या निवासस्थानी खंडणी स्वीकारली गेली आहे. गुन्हा चाळीसगावच्या हद्दीत घडला आहे. परिणामी तिघांच्या खंडणीचा गुन्हा चाळीसगाव शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून गुन्ह्याचा तपास आयपीएस अधिकारी, स्थानिक गुन्हेशाखा किंवा अपर पोलिस अधीक्षकांकडे तपासाला दिला जाण्याची शक्यता आहे. दाखल गुन्ह्यात तब्बल नऊ विवीध गंभीर कलमांसह संघटितरित्या कट रचणेचा समावेश केल्याने ॲड. चव्हाण यांच्यासह तिघांच्या अटकेची शक्यता वर्तविली जात आहे.

गुन्ह्याचा चाळीसगाव नामा

सूरज झंवर यांनी फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी उदय नाना पवार (रा. चाळीसगाव) यांच्यामार्फत दिलेल्या धमकीनुसार व्यवसायातील रक्कम रुपये पाचशे व दोन हजार रुपयाच्या चलनी नोटा घेऊन एकूण १ कोटी २२ लाख रुपये घेऊन उदय पवार यांच्याकडे (२० नोव्हेंबर २१) चाळीसगाव येथे गेले होते. त्यांच्या मालकीच्या ओरिजनल वाईन शॉप येथे पोहोचल्यावर सूरज झंवर यांनी उदय पवार यांना फोन केला. त्यानंतर ते तेथे त्यांचेकडील बुलेट गाड़ी घेऊन आले व तेथून त्यांच्या दुचाकीच्या मागे घरापर्यंत पोहचलो.

इंटरनेट कॉलद्वारे संदेश

उदय पवार यांनी घरी घेऊन गेल्यावर विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्या सांगितल्यानुसार १ कोटी रोख व २० लाख स्वतःसाठी आणि हवाल्याचे दोन लाख रुपये रोख असे एकूण एक कोटी बावीस लाख रुपये माझ्याकडून रोख स्वरूपात घेतल्याचे सूरज झंवर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पैसे घेतल्यानंतर व ते मोजल्यानंतर उदय पवार याने साध्या फोनचा वापर न करता अॅड. चव्हाण यांना इंटरनेटच्या माध्यमातून चालणारे सिग्नल ॲप्लीकेशनद्वारे मॅसेज पाठवून कळविले.

उदय पवार यांच्या मोबाईलद्वारे सिग्नल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून अॅड. चव्हाण यांना आता तरी माझ्या वडिलांना जेलमधून सोडण्यासाठी व आमची गोठवलेली बँक खाती मुक्त करण्यासाठी मदत करा. मी तुमची मागणी पूर्ण केली आहे, असे आर्जव सूरज झंवर यांनी केल्याचे लेखी फिर्यादीत नमूद केले आहे. त्याचवेळी उदय पवार याने सिग्रल अॅपवरुन अॅड. प्रवीण चव्हाण यांना संपर्क केला व सूरज यांचे बोलणे करून दिले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, तू आम्ही सांगितल्या प्रमाणे एक फाईल (एक कोटी रुपये) दिले आहेस, चिंता करू नको. जी मदत गिरीश महाजन करू शकले नाही ती आम्ही करू शकतो. मी व शेखर सोनाळकर तुझे सर्व काम करून देतो, असे सांगितले. तेव्हा शेखर सोनाळकर हा देखील संभाषणात सहभागी होता, असे सूरज झंवर याने तक्रारीत नमुद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT