Devendra Fadanvis & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis: फडणवीस बरसले, महाविकास आघाडीला म्हणाले, 'तोंड' वर करून निवडणुकीत येतात"

Devendra Fadnavis Politics, Fadnavis angry on Sharad Pawar, says what they done 50 years-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कोणते मुद्दे असतील याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Sampat Devgire

Fadnavis Vs Pawar: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल शिंदखेडा (धुळे) दौऱ्यावर होते. त्यांनी शिंदखेडा येथील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर त्यांनी चांगलीच आगपाखड केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाविकास आघाडीच्या नेत्यांवर झोंबणारी टीका केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय कामे केली, असा संतप्त प्रश्न त्यांनी आपल्या दौऱ्यात केला. केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने महाराष्ट्राच्या सिंचनासाठी केलेल्या कामकाजाचे तोंड भरून कौतुक करण्यास ते विसरले नाहीत.

विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात भूमिपूजन, लोकार्पणाच्या कार्यक्रमांची गर्दी आहे. अशाच या कार्यक्रमात किंबहुना या निवडणुकीचा प्रचार वाटावा अशाच अविर्भावात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना "चार्ज" करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रात यापूर्वी सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सरकार असताना काय केले, असा प्रश्न देखील उपस्थित केला. त्यांच्या तुलनेत भाजपच्या सत्ताकाळात प्रचंड कामे झाल्याचा दावा त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यातून भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघातील विकास कामांविषयी त्यांनी कौतुक केले. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हेच भाजप आणि फडणवीस यांचे टार्गेट असतील, असे संकेत त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्र्यांनी थेट नाव न घेता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आपला राग व्यक्त केला. ते म्हणाले, निवडणुकीत ते 'तोंड' वर करून येतात. त्यांनी काय केले? त्यांना तुम्ही विचारले पाहिजे की, केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने गेल्या पाच सात वर्षात सिंचन क्षेत्रात मोठे काम केले. ते तुम्हाला का जमले नाही?.

सध्याच्या सरकारने सिंचनासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. कामांना चालना दिली. सिंचन प्रकल्प कार्यान्वित केले. मग काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षांनी ते काम का केले नाही. त्यांना हे का जमले नाही?

जामफळ (शिंदखेडा) येथे धरणाच्या लाभक्षेत्रात बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेचे भूमिपूजन यावेळी फडणवीस यांनी केले. सुलवडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत दोन हजार ४०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. त्यातील एक हजार ५२ कोटी रुपयांच्या बंदिस्त नलिका वितरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजा कृषी संजीवनी योजनेतून महाराष्ट्रासाठी तीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निमित्ताने नार-पार गिरणा लिंक योजनेद्वारे गुजरातला जाणारे दहा टीएमसी पाणी अडविले जाईल.

अशी मोठी आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी कामे महायुती सरकारने सुरू केली आहेत. गेल्या पन्नास वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे काम का जमले नाही? असा प्रश्न त्यांनी केला.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही सध्याच्या महाविकास आघाडीचे राजकारण जातीपातीचे आहे. त्यांना विकासाशी काही देणे घेणे नाही. त्यामुळेच त्यांचा जनतेची दिशाभूल करणे हा एकमेव अजेंडा असल्याची टीका केली.

एकंदरच श्री फडणवीस यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे नेते हे त्यांचे प्रमुख राजकीय टर्गेट असतील. भाजपकडून या आघाडीच्या नेत्यांना खास टार्गेट केले जाईल असे संकेत या दौऱ्यातून मिळाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT