Eknath Shinde, Ajit Pawar & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra fadnavis Politics: शिंदे, फडणवीसांनी नाशिकमध्ये फुंकला महायुतीच्या प्रचाराचा बिगुल!

Sampat Devgire

Eknath Shinde news: महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्याचे लोकार्पण नाशिकमध्ये झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वरूप आणि तयारी हा चर्चेचा विषय आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने या दोन्ही अर्ध पुतळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची तयारी आणि नियोजन भुजबळ यांच्या टीमने केले होते. त्यामुळे त्यात अतिशय बारीक-सारीक गोष्टींचा विचार करण्यात आला होता.

शहरात विविध आमदारांच्या मतदारसंघात विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील यानिमित्ताने झाले. पावसाने त्यात काहीसा व्यत्यय आणला. अन्यथा सगळीकडे या नेत्यांच्या भाषणांचा पाऊस पडला असता.

यावेळी झालेल्या कार्यक्रमातून महायुतीने शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला, असा संदेश देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कातर्यक्रमात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शरसंधान केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसह विविध मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मराठा आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचे भूमिपूजन, बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन, नाशिक पश्चिम मतदारसंघात रस्त्याचे काँक्रिटीकरण हे महत्त्वाचे प्रकल्प होते.

शहरातील मुंबई नाका येथील महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन, इंदिरानगर येथील अंडरपासचे रुंदीकरण आणि हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या नूतनीकरणाचा यामध्ये समावेष होता. असे विविध कार्यक्रम होते.

या कार्यक्रमांवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. यातील काही प्रकल्पांची उपयुक्तता वादात आहे. मात्र एकंदरच स्थानिक आमदारांनी यानिमित्ताने आपण विकासाचे किती काम करतो, असे मतदारांपर्यंत पोहोचविले. मुख्य म्हणजे या निमित्ताने महायुतीचे तिन्ही नेते आणि या पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले होते.

मुंबई नाका येथील पुतळ्याचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये फुले दांपत्याचा देशातील सर्वात मोठा अर्ध पुतळा उभा राहतो आहे. याचा हेवा वाटतो. या स्मारकाच्या निमित्ताने समाजाला नक्कीच वौचारीक प्रेरणा मिळेल. त्यांच्या आदर्श नुसार वाटचाल करून आम्ही सरकार चालवतो आहोत, असे सांगत जनतेचा आशीर्वाद निश्चितच आम्हालाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

नाशिक शहरात तीन्ही मतदार संघात राहुल ढिकले, सीमा हिरे आणि देवयानी फरांदे हे भाजपचे आमदार आहेत. लगतच्या देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे आमदार आहेत. या निमित्ताने या चारही मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली, असे चित्र पाहायला मिळाले.

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन आणि मतदारांमध्ये राजकीय संदेश देण्यात ते यशस्वी ठरले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असा संदेश यातून कार्यकर्त्यांना मिळाला.

-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT