Rohit Pawar | Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar : रोहित पवार यांनी हिशेबच मांडला, भाजपच्या दृष्टीने मतदाराची किंमत ३० पैसे!

Rohit Pawar criticized Devendra fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी पैसे वाटपाबाबत भाजपचा पंचनामा केला.

Sampat Devgire

Jalgoan News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन निवडणुकीत पैशांचा वापर करणार असल्याच्या तक्रारीबाबत भाजपचा अक्षरशः पंचनामाच केला.

आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महायुतीचे सरकार आणि विशेषता भाजप यांच्याकडून सुरू असलेले निवडणुकीतील गैरप्रकार यावर टीका केली. जामनेर मतदार संघात मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर त्यांनी स्पष्टच सांगितले.

ते म्हणाले, जामनेरचे भाजप उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांकडे प्रचंड पैसा आहे. अगदी गोदाम भरेल एवढा पैसा आहे. त्याचा वापर ते या निवडणुकीत करण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी आहेत.

मतदारांनी याबाबत सजग राहिले पाहिजे. ते तुम्हाला एका मतासाठी ते पाचशे रुपये देतील. कदाचित एक हजार रुपये देतील. त्यानंतर ते पुढच्या पाच वर्षांसाठी आमदार होतील. मतदारांच्या पदरी काय पडणार?.

पुढील पाच वर्षासाठी ते तुम्हाला पाचशे रुपये देतील. म्हणजे एक वर्षाला शंभर रुपये आणि वर्षाचे दिवस 365 असतात. त्यामुळे फार तर दिवसाला 30 पैसे देतील. हजार रुपये दिले तर 60 पैसे होतील. त्यांनी तुमची किंमत 30 पैसे केली आहे.

आपण सर्व स्वाभिमानी मतदार आहात. आपली किंमत 30 पैसे होत असेल तर, त्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे. पैसा टाकला की मतदारांचा स्वाभिमान विकत घेता येतो, असा येथील उमेदवाराचा गैरसमज आहे. तो गैरसमज आपण येत्या निवडणुकीत दूर केला पाहिजे.

भारतीय जनता पक्षाचे नेते पुन्हा सत्तेत आले तर आपला महाराष्ट्र गुजरातच्या पायावर नेऊन ठेवतील. दिल्लीच्या नेत्यांच्या आदेशानुसार वागतील. मराठी माणूस कधीही गुजरात किंवा दिल्ली पुढे झुकला नाही.

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार पवार यांनी खरपूस समाचार घेतला. आमदार पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणतात मी अभिमन्यू आहे. मी विरोधकांचा चक्रव्यूह भेदणार आहे. मात्र महाराष्ट्रातील गोरगरीब जनता, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक यांना तुम्ही देशोधडीला लावले. त्यांनी जो चक्रव्युह महायुतीच्या कारभारामुळे तयार केला आहे तो भेदण्याची क्षमता फडणवीस यांच्यात नक्कीच नाही.

खरे तर फडणवीस हे नवीन युगातले जनरल डायर आहेत, अशी गंभीर टिका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांना देखील सोडले नाही. वारकऱ्यांवर लाठीमार केला. जालन्यात समाजाचे लोक आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. तेथे यांनी आदेश देऊन लाठीमार केला. रबरी गोळ्यांचा मारा केला. लहान मुले, महिला, निर्दोष नागरिक, उपोषणकर्ते या सगळ्यांचा छळ केला.

लाठीमाराने हे सर्व लोक रक्तबंबाळ झाले. त्यांचा दोष तरी काय होता?. ते निष्पाप लोक उपोषणाला बसले होते. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार सुद्धा भाजप आणि उपमुख्यमंत्री फडणवीस जनतेला देण्यास तयार नाहीत. त्यांना महाराष्ट्रात गुजरात शाही आणायची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT