Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भगवान गडावर तेव्हा दगड खाल्ले.. आता परिस्थिती बदललीय! : मुंडेंनी सांगितला प्रवास

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केले. त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नियतीने आपल्या खांद्यावर टाकली आहे. ती आपण पूर्ण करणार आहोत, असा विश्‍वास राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला. जळगाव येथे ते बोलत होते. (Dhananjay Munde Latest news)

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लोकनेते (स्व.) गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वाराचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी मुंडे यांनी आपला संघर्ष मांडला. राज्याचा विरोधी पक्षनेता झालो तेव्हा भगवानगडावर माझ्यावर दगड फेकण्यात आले. मात्र नियतीचे चक्र फिरले. त्याच गडावर मला तेथील महंतांनी जबाबदारी दिली.

मुंडे म्हणाले, की भाजप राज्यात सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्या काळी गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी केले. महाराष्ट्राचे दोनच नाथ ‘एकनाथ-गोपीनाथ’ अशा घोषणा आम्ही त्या वेळी देत होतो. (स्व.) गोपीनाथ मुंडेंच्या सहवासात आपण राजकीय कारकीर्द घडविली. त्यांचे कार्य आपण अत्यंत जवळून पाहिले आहे. ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती, ती आपण मंत्री म्हणून पूर्ण करू शकलो, आपल्या कार्यकाळात आपण हे महामंडळ स्थापन केले. सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांचा विकास करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ती आपण पूर्ण करणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आज आपण नायक असलो तरी आपल्याला मोठा राजकीय संघर्ष करावा लागला आहे. अगदी आपल्याला दगडही झेलावे लागले आहेत. परंतु नियतीने आज त्याच संघर्षातून आपल्याला नायक बनविले आहे.

मुंडे असते तर आज वेगळी स्थिती : खडसे

राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे या वेळी म्हणाले, की ज्या काळी भाजपला बहुजन समाजाचा पक्ष म्हणून ओळख देण्याचे कार्य गोपीनाथ मुंडे यांनी केले, त्यांनी ‘माधव’माळी, धनगर, वंजारी एकत्रीकरणाचे कार्य केले. आज जर गोपीनाथ मुंडे असते, तर राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी राहिली असती. मुंडेचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज धनंजय मुंडे यांच्यावर असून, त्यांनी ती पूर्ण करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT