Dhule Standin committee meeting

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

बनावट लसीकरण; गुन्हा दाखल करण्याची तयारी... पण?

महापालिका प्रशासन पोलिसांत तक्रार देण्याची तयारी करीत आहे.

Sampat Devgire

धुळे : बोगस कोविड (Covid19) लसीकरण प्रमाणपत्र वितरणाच्या विषयावर अखेर महापालिका (Dhule) प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची तसदी घेतली. याबाबत महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत खुलासा करून गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकारी प्राधिकृत केल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर प्रशासनाला याप्रकरणी कार्यवाही घेणे भाग पडले आहे.

कोविड १९ लसीकरणाच्या प्रक्रियेत नागरिकांना लस न देताच मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचे प्रमाणपत्र वितरित झाले व यासाठी आर्थिक व्यवहारही झाल्याचा आरोप महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सुनील बैसाणे यांनी प्रथम केला होता. नंतर याच विषयावर शिवसेनेने आंदोलन करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. पुन्हा स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजप सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला होता. यात अधिकाऱ्यांची एकमेकांवरील कुरघोडीचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे या विषयावर आयुक्तांनीच खुलासा करावा, तोपर्यंत सभा तहकूब ठेवावी, अशी मागणी झाल्याने सभा तहकूब झाली होती. ही सभा गुरुवारी महापालिकेत झाली. सभापती संजय जाधव, आयुक्त टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सभेत आयुक्त टेकाळे यांनी या विषयावर प्रशासनाची बाजू मांडली.

कर्मचारी दोषी नाहीत

आयुक्त टेकाळे म्हणाले, की बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र वितरणाचा विषय समोर आल्यानंतर लगेच चौकशी अधिकारी नेमला. चौकशी अहवाल प्राप्त झाला असून त्याचे अवलोकन केले असता, कोविड लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियेत कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी आढळून येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांना प्राधिकृत केले आहे. आयुक्त टेकाळे यांच्या या खुलाशानंतर सदस्य बैसाणे, सदस्य शीतल नवले यांनी प्रशासनाने याप्रकरणी सकारात्मक कार्यवाही केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

आज तक्रार करणार

दरम्यान, याप्रकरणी प्राधिकृत अधिकारी सोनार गुरुवारी सायबर सेलकडे तक्रार घेऊन गेले होते. मात्र, सेलकडून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी लागेल, असे सांगण्यात आले. दरम्यान, नाशिक क्षेत्रीय पोलिस महानिरीक्षक दौऱ्यावर असल्याने शहर पोलिसांची व्यस्तता होती. शिवाय केवळ तक्रार नव्हे, तर फिर्याद द्यावी लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी (ता. ७) महापालिकेच्या वकिलांमार्फत फिर्याद तयार करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे श्री. सोनार यांनी सांगितले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT