Dr. Shobha Bacchav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Politics : धुळ्यात भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीची व्यूहरचना ठरली, थेट वरिष्ठ पातळीवरून आले आदेश..

Mahavikas Aghadi to fight unitedly in Dhule local elections, MP Shobha Bacchav confirms alliance strategy against BJP : धुळे जिल्ह्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, असे संकेत खासदार शोभा बच्छाव यांनी दिले.

Ganesh Sonawane

Dhule Politics : धुळे जिल्ह्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, असे संकेत कॉंग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी दिले. याबाबत वरिष्ठ स्तरावरून तसे निर्देश प्राप्त झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप व महायुतीच्या इतर दोन्ही घटक पक्षांना शह देण्यासाठी धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे कॉंग्रेस, शिवसेना(उबाठा) व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तीन्ही सोबत राहणार असल्याचे संकेत आता स्पष्ट झाले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी रविवारी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

धुळे शहरातील व्यापारी आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी पारोळा रोडवरील व्यापारी महासंघाच्या कार्यालयात खासदार शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, जीर्ण खांब व विद्युत तारा, खराब रस्त्यांची स्थिती, टोलमाफीची मागणी, एमआयडीसी परिसरात पोलीस ठाण्याची गरज तसेच अवैध दारू विक्रीमुळे उद्भवणाऱ्या अडचणी अशा विविध समस्या व्यापाऱ्यांनी मांडल्या. खासदार बच्छाव यांनी उपस्थितांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले आणि संबंधित यंत्रणांमार्फत या समस्या सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

राज्यात अनेक ठिकाणी या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका पुढे येताना दिसत आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात नेमके काय समीकरण राहणार, याबाबत चर्चेला उधाण आले होते. मात्र खासदार बच्छाव यांनी स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु झाली असून, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र येणार की मैत्रीपूर्ण स्पर्धा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, खासदार शोभा बच्छाव यांनी स्पष्ट संकेत दिल्याने, धुळे जिल्ह्यात या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहेत.

गेल्या निवडणुकीत (२०१८) धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला होता. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली होती. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली होती.

धुळ्यात कॉंग्रेसचे कुणाल पाटील यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा असल्याने कॉंग्रेसचे अस्तित्वच धुळे जिल्ह्यात धोक्यात आहे. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षालाही जिल्ह्यात घरघर लागलेली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षातील काही नेत्यांचा कुणाल पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याने तोही पक्ष खिळखिळा होणार आहे. त्यामुळे तीन्ही पक्ष एकत्र येऊनही भाजपची बरोबरी करणे शक्य नाही अशी परिस्थिती सध्या आहे.

दरम्यान जिल्ह्यात महायुतीमध्येही भाजपचीच ताकद अधिक आहे. शिवसेना शिंदे गटाची जिल्ह्यात काहीही ताकद नाही. राष्ट्रवादीलाही येथे चेहरे नव्हते. परंतु भाजपमधील काहीजण अजित पवार यांच्यासोबत गेल्याने अजित पवारांचा पक्ष जिल्ह्यात काहीसा ऑक्सीजनवर आला आहे. त्यामुळे भाजप जिल्ह्यात वरचढ आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT