Dada bhuse in Meeting
Dada bhuse in Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse; आंदोलकांमधील मतभेद दादा भुसेंच्या पत्थ्यावर

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्र (Maharashtra) सरकारकडून गावांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याने आपला भाग गुजरातला (Gujrat) जोडण्याची मागणी करणाऱ्या ५५ हून अधिक गावे, वाडे पाडयांवरील ग्रामस्थांमध्ये (Protester) आज उभी फूट पडली. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या बैठकीत चिंतामण गावित यांच्या गटातील ग्रामस्थांनी गुजरातमध्ये समावेशाची मागणी केली. (Miss communication and differences in protester given benifit to Dada Bhuse)

मात्र, याचवेळी दाखल झालेल्या दुस-या गटाने आम्हाला महाराष्ट्रातच ठेवावे अशी मागणी केली. त्यामुळे गावित यांच्या गटाला आपण महाराष्ट्रात राहणार असल्याचा शब्द पालकमंत्र्यांना देत, आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करावी लागली.

गुजरात सीमावर्ती भागातील सुरगाणा तालुक्यातील ५५ हून अधिक गावे, वाडया, वस्त्यांना महाराष्ट्र राज्याकडून मुलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत काही गावातील ग्रामस्थांनी गुजरातमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सुरगाणा तहसीलदारांना दिले होते. याच प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीने वासदा तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यामुळे या प्रश्न राज्यभर चर्चेचा झाल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने सीमा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करत मंगळवारी (ता.६) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

बैठकीत, संघर्ष समितीचे प्रमुख नेते चिंतामण गावित यांनी समस्यांचा पाढा वाचला तर समितीमधील पदाधिकारी सरपंचांनीदेखील महाराष्ट्रातील सरकारचे या गावांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. पालकमंत्री भुसे यांनी सर्व चर्चेनंतर सीमावर्ती भागातील विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम प्राधान्याने आखण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतरही समितीचे नेते गावित गुजरातच्या मुद्द्यावर ठाम राहिले. विशेष पॅकेजची अधिवेशनात घोषणा करावी अशी भूमिका घेतली.

त्यावर पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, याच गोंधळात गावित यांच्या समवेत आलेल्या काही सरपंचांनी माईकचा ताबा घेत भुसे यांनी दिलेल्या आाश्वासनांवर विश्वास ठेवत आपण महाराष्ट्र राज्यात राहाणार असल्याची भूमिका बैठकीत मांडली.

दरम्यान, गावित हे पालकमंत्र्यांशी गुजरातमध्ये जाण्याच्या मुद्द्यावर चर्चा करीत असतानाच सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेवरील १२ गावांमधील सरपंचांनी भुसे यांची भेट घेत आपण कोणत्याही परिस्थितीत गुजरातमध्ये जाणार नसल्याची भूमिका मांडत या प्रश्नावर काही लोक राजकारण करीत असल्याचे निर्देशनास आणून दिले. गुजरातमध्ये जाण्याचा मुद्दा हा ठराविक लोकांनी घेतला असून सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांसमोर गावितांबरोबरच आलेले काही सरपंच आणि १२ सरपंचांच्या एका गटाने महाराष्ट्रातच राहणार असल्याचा शब्द देत गावित यांनी आंदोलन तूर्तास स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.

श्री. भुसे यांनी आदिवासींच्या प्रश्‍नांची गाऱ्हाणे ऐकून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रावर गुजरातमधील सहभागाबद्दल दिलेल्या निवेदनाची आठवण चिंतामण गावित यांना करुन दिली. त्यावर श्री. गावित यांनी माझ्या पक्षाचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले. पत्रकारांनी वासदा तहसिलदारांना निवेदन देण्यासाठी दीड तास थांबलात, मग विकास कामांसाठी सहा महिने थांबणार काय? असा प्रश्‍न केला. राष्ट्रवादी काँग्रेस की भारतीय जनता पक्ष आपणाला खिंडीत पकडत आहे? असा प्रश्‍न पत्रकारांनी श्री. भुसे यांना विचारला. त्यावर श्री. भुसे यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. आमदार पवार यांनी आताच्या सरकारवर आमचा विश्‍वास असल्याने गुजरातमध्ये जाऊ नये, अशी भूमिका मांडली. संघर्ष समितीने पालकमंत्र्यांना चुकीचे पाऊल उचलणार नाही, असे स्पष्टीकरण दिले, त्यावर श्री. गावित यांनी पालकमंत्र्यांवर भरवसा ठेवतो आणि आंदोलन तूर्त स्थगित करत आहे, असे जाहीर केले. हे एकीकडे होत असताना सीमावर्ती भागातील १२ सरपंचांचे शिष्टमंडळ घेऊन अलुंगणचे सरपंच हिरामण गावित सभागृहात पोचले. संघर्ष समितीच्या बैठकीस उपस्थित असलेल्यांपैकी काही सरपंच त्यांच्यासमवेत श्री. भुसे यांना भेटले. श्री. भुसे यांनी त्या सरपंचांना मी बैठकीसाठी बोलवले का? असे विचारल्यावर त्या सरपंचांनी नाही असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT