Dilip Khedkar property Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dilip Khedkar ACB Case : बडतर्फ IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या घरावर ACBचा छापा; 13.30 कोटींची बेहिशोबी मालमत्ता, गुन्हा दाखल

ACB files a case against Dilip Khedkar over alleged disproportionate assets : दिलीप खेडकर आणि पत्नी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा; 1995 ते 2023 मधील आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची चौकशी

Pradeep Pendhare

ACB case against Dilip Khedkar : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर पुन्हा चर्चेत आले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत खेडकर कुटुंबाकडे 13 कोटी 30 लाख 81 हजार 696 रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा तपासातील निष्कर्ष समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) पथकाने पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील खेडकर यांच्या निवासस्थानी पहाटे छापा टाकला. या कारवाईत नाशिक, अहिल्यानगर आणि पाथर्डी पोलिसांचे मिळून सुमारे 40 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती आहे. खेडकर यांच्या मालमत्तेबाबत चौकशी करण्याची मागणी करणारी तक्रार 2012 मध्ये करण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने खेडकर दाम्पत्याच्या 1995 ते 2023 या कालावधीतील आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तपासात खेडकर कुटुंबाचे ज्ञात उत्पन्न 13 कोटी 2 लाख 78 हजार 775 रुपये, तर त्याचवेळी एकूण खर्च 15 कोटी 33 लाख 74 हजार 855 रुपये असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (ACB) पथकाला आढळले. ज्ञात मालमत्तेचे मूल्य 10 कोटी 99 लाख 85 हजार 616 रुपये, म्हणजे 102 टक्के जास्त असल्याचे तपासात समोर आले.

ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्ता आणि खर्चाची एकत्रित तफावत 13 कोटी 30 लाख 81 हजार 696 रुपये असल्याचे ACBच्या तपासात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही रक्कम ज्ञात उत्पन्नाच्या सुमारे 102 टक्के अधिक असल्याचा तपास यंत्रणेचा निष्कर्ष आहे.

अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता

तपासादरम्यान दिलीप खेडकर यांच्या नावावर अहिल्यानगर, पुणे, हवेली, पवई, बारामती, भालगाव, मुळशी, औंध, पनवेल, खरवंडी कासार आणि शिरूर कासार यांसह विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता असल्याचे कागदपत्रांवरून आढळल्याचे सांगण्यात आले आहे. खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 1989 पासून सेवेत होते आणि मे 2023 मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या सेवेच्या कालावधीतील आर्थिक व्यवहारांसह 1995 ते 2023 या कालखंडातील मालमत्ता आणि खर्चाची ACBकडून छाननी करण्यात आली.

खेडकर दाम्पत्याचा कागदोपत्री घटस्फोट

तपासात दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांचा कागदोपत्री घटस्फोट झाल्याचे आढळल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, विविध संपत्तीच्या व्यवहारांमध्ये दोघांचाही सामायिक सहभाग असल्याचे कागदपत्रांमधून स्पष्ट झाल्याचा ACBचा दावा आहे.

2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली

दिलीप खेडकर यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर अहिल्यानगरच्या तत्कालीन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. त्यांना 13,749 मते मिळाली होती. पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणकाळातील वादानंतर दिलीप खेडकर यांच्या संपत्तीचा मुद्दाही चर्चेत आला होता. 2024 मधील निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात त्यांच्या संपत्तीविषयी माहिती पुढे आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT