

Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील ‘अमृतकुटी’वर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) उपस्थित होते. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेला या बैठकीमुळे अधिकृत राजकीय वळण मिळाले आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी थोरात यांनी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट झाले असून, विविध गटांमधील मतभेद संवादातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ देत जिल्हा बँकेची (DCC Bank) निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. दुष्काळाच्या काळात राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
गडाख यांच्या या भूमिकेनंतर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागील हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. त्याच काळात थोरात यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीमुळे या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे भूमिका मांडली. “जिल्हा बँक शेतकरी आणि कारखान्यांसाठी महत्त्वाची बँक आहे. काही काळ वगळता बँकेची वाटचाल यशस्वी झाल्याचे दिसते. यापूर्वीही बिनविरोध निवडणुकीसाठी माझ्याकडून प्रयत्न झाले आहेत,” असे थोरात यांनी सांगितले. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, सर्वसमावेशक परिस्थिती लक्षात घेऊन हे मतभेद बाजूला ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे थोरात यांनी सांगितले.
बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपला प्रयत्न असून, पालकमंत्री विखे यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याचे थोरात यांनी सांगितले. काही अडचणी आहेत; मात्र त्या संवादातून दूर करता येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांच्याशीही चर्चा केल्याचे थोरात यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत राजकारण नको, हा या प्रयत्नामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या कारभारात पक्षीय राजकारणापेक्षा सहकाराला प्राधान्य देण्याची भूमिका थोरात यांनी मांडली. “राजकारण व्यक्तिद्वेषाचे नसावे,” असे सांगत त्यांनी यापूर्वीही पक्षविरहित पद्धतीने बँक चालविण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले. जिल्हा बँकेत पक्षाचे जोडे बाहेर ठेवण्याचा कायम प्रयत्न असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांनीही ही भूमिका समजून घेण्याची गरज असल्याचे थोरात यांनी म्हटले.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे बिनविरोध निवडणुकीसाठी राजकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. थोरात-विखे यांची भेट, यशवंतराव गडाख यांचे आवाहन आणि विविध नेत्यांशी थोरात यांनी केलेल्या चर्चेमुळे बिनविरोध निवडणुकीच्या शक्यतेची चर्चा आता अधिक तीव्र झाली आहे.
मात्र, विविध गटांच्या मागण्या आणि जागावाटपाबाबतचे मतभेद दूर होतात का, यावर बिनविरोध निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँक ही सर्व कारखानदारीची मातृसंस्था आहे, असे सांगत थोरात यांनी सहकार क्षेत्रातील ही संस्था राजकीय संघर्षापेक्षा सर्वसमावेशक पद्धतीने चालविण्याची गरज अधोरेखित केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या चर्चांकडे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.