Narhari Zirwal
Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रस्ते, कामांच्या दर्जाबाबत तडजोड करू नका!

Sampat Devgire

नाशिक : पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील रस्ते आणि विविध पायाभूत सुविधांचा दर्जाबाबत (Quality of works) अधिकाऱ्यांनी कुचराई करू नये, सर्व कामांचा दर्जा चांगला राहील याची काळजी घ्यावी. अधिकाऱ्यांनी यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, कामांबाबत विशेष दक्ष राहा अशा सूचना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी आज मुंबई येथे दिल्या.

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील विविध विकास कामांबाबत अधिकारी सहकार्य करत नसल्याच्या वाढलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने श्री. झिरवाळ यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना थेट मुंबईत बोलवून आढावा घेतला.

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींचे निर्लेखन करा. नवीन आरोग्य उपकेंद्राची मागणीबाबत फेर सर्व्हेक्षण करा. उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तलाठी आणि सर्कल कार्यालयांचे नूतनीकरण करावे, ते करताना नागरिकांच्या सोयीचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. रस्त्यांची कामे आणि वर्कआर्डर काढण्याबाबत अधिकारी सहकार्य करीत नसल्याच्या वाढलेल्या तक्रारींबाबत श्री. झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना समज देत सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत होण्यासाठी प्रयत्न करावेत ,यापुढे कुणाच्याही तक्रारी यायला नको अशी सक्त ताकिदच दिली.

नियमाच्या अधीन कामे करा

पेठ आणि दिंडोरी तालुक्यासाठी ठिबक सिंचनासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करा. खतांचा पुरवठा सुरळीत राहील, याची काळजी घ्यावी. पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील बहुतांश गावे जंगलात आहेत. या गावांचे पोहोच रस्ते उत्तम दर्जाचे करा. हे रस्ते करण्यासाठी वन विभागाने नियमांचे पालन करुन परवानगी द्यावी. वनसंपदेला धक्का न लावता बंधारे करा. पाण्याचे जास्तीत जास्त स्त्रोत निर्माण करा, अशी सूचना त्यांनी केली.

पेठ येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी मैदान आणि संरक्षक भिंतीसाठी निधीबाबत श्री. झिरवाळ यांच्या सूचनेवर जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याणी धात्रक यांनी टप्पाटप्प्याने निधी देऊ, असे सांगितले.

यावेळी विधानभवनात झालेल्या या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी तसेच राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, उपवनसंरक्षक पंकज धर, दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT