Gulabrao Patil & Eknath Khadase

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटील म्हणाले, `आम्ही इतक्या खालच्या स्तराला जात नाही`

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते खडसेंना इशारा

Sampat Devgire

जळगाव : मुक्ताईनगरचा वाद अत्यंत खालच्या स्तरावर गेला असल्याचे नमूद करून ते म्हणाले, की आमचेही विरोधक जिल्ह्यात आहेत. आम्ही एकमेकांविरुद्ध लढाया करतो. परंतु, इतक्या खालच्या स्तरावर आम्ही जात नाही. माजी मंत्री खडसे व आमदार पाटील दोघांनीही आता सामंजस्याने घेणे गरजेचे आहे, असे मतही मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.

महिलेवर हल्ला झाला हे निषेधार्हच आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या हल्ल्यामागे जे कोणी असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, चौकशी होईपर्यंत शिवसेनेला (Shivsena) कोणीही बदनाम करू नये, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठामंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना दिला आहे.

मुक्ताईनगर येथे जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यात सुदैवाने त्या बचावल्या. याबाबत श्री. खडसे यांनी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतले होते. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की या प्रकरणी आमदार चंद्रकात पाटील यांनीच विधानसभेत मागणी केली आहे की, विशेष आयपीएस अधिकाऱ्याकंडून निष्पक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी. त्यामुळे आमचीही तीच मागणी आहे. यामुळे, दूध का दूध, पाणी का पाणी होईल. जो दोषी आढळेल, अगदी तो आमच्या पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यास आम्ही हयगय करणार नाही. मात्र, मला तरी असे वाटते की, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला कोणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये.

खडसेंनी प्रमाणपत्र देऊ नये

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील शिवसेनेचे नव्हे, तर अपक्ष आमदार आहेत, असे जाहीरपणे म्हटले होते. त्याबाबत श्री. पाटील म्हणाले, की खडसे यांनी पक्षाचे प्रमाणपत्र वाटू नये. तो अधिकार शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोण कोणत्या पक्षात राहून कोणत्या पक्षात गेला हे सर्व जनतेला माहीत आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीचे आमदार आहेत. स्वत: खडसेसुद्धा महाविकास आघाडीचे नेते आहेत. या गोष्टी इतक्या लांबपर्यंत घडू नयेत, याची काळजी त्यांनी पूर्वीपासूनच घ्यायला हवी होती.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT