नाशिक : मुंबई-पुण्यानंतर (Mumbai) वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये नाशिक (Nashik) आघाडीवर आहे. मुंबई व पुणे शहरांचे नियोजन करताना ज्या चुका झाल्या, त्या नाशिकचे नियोजन करताना होऊ नये. वाहतूक कोंडी ही शहरांमध्ये मोठी समस्या झाली आहे. नाशिकमधील वाहतूक कोंडीवर आत्ताच तोडगा काढणे गरजेचे आहे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या. (Traffic congestion is a big issue of future in city planing)
नाशिक शहरासाठी आउटर रिंग रोडची नितांत गरज असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आउटर रिंग रोड तयार करण्यात यावा. त्यासाठी चांगले नियोजन करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
‘क्रेडाई नाशिक मेट्रो’तर्फे ‘शेल्टर- २०२२’ या गृहप्रकल्पांचे प्रदर्शन डोंगरे वसतिगृह मैदानावर गुरुवार (ता. २४)पासून सुरू झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी दृकश्राव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिककरांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.
‘मुख्यमंत्री झाल्यापासून नाशिकला चार ते पाच वेळेस भेट दिली, यादरम्यान नाशिक संदर्भातील प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. मुंबई-पुणेनंतर नाशिकची वेगाने वाढ होत आहे, पर्यटन उद्योग, ॲग्रो इंडस्ट्री आणि एज्युकेशन हब येथे वाढत आहेत. परंतु शहर वाढत असताना त्याचे सुयोग्य नियोजनदेखील गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या विकासासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनाही विनंती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संपूर्ण राज्यासाठी एकिकृत विकास नियंत्रण नियमावली तयार केली. या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात एकजिन्सीपणा यावा हा हेतू होता, सरकार बांधकाम व्यावसायिकांची काळजी करत असताना सर्वांना चांगली व वाजवी दरात घरे मिळावीत, यासाठी सरकारसह बांधकाम व्यावसायिकांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्प अहवालाचे प्रकाशन झाले. ‘क्रेडाई मेट्रो’चे अध्यक्ष रवी महाजन यांनी प्रास्ताविक केले. खासदार हेमंत गोडसे म्हणाले, की शेल्टरच्या माध्यमातून शहराचे ब्रॅन्डिंग होत आहे. मोठ्या शहरांच्या विकासात झालेल्या त्रुटी दूर करून नाशिकचा विकास त्या अनुषंगाने करण्यासाठी विचार व्हावा. शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोड विकसित करताना तातडीने जागा मिळावी, यासाठी शेतकऱ्यांना पाचपट टीडीआर देण्याचा प्रयत्न आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, की बांधकामाचे ऑनलाइन प्रस्ताव टाकताना अडचणी येत असल्या तरी महाराष्ट्रात नाशिक हे ऑनलाइन परवानगी देण्यात आघाडीवर आहे. टाटा कम्युनिकेशन सर्व्हिसेसच्या माध्यमातून ऑनलाइन परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.