MP Goval Padvi & Dr Heena Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Heena Gavit Politics: हिना गावित यांनी खासदार पाडवी यांना फटकारले, काय आहे कारण?

Sampat Devgire

Gavit Vs Padvi News: लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. त्यामुळे अद्यापही नवी घोषणा अथवा मंजुरी मिळणाऱ्या कामांचे श्रेय कोणाला? यावरून वाद रंगला आहेत. नंदुरबार मतदारसंघातही सध्या हाच चर्चेचा विषय ठरला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी नुकतेच काँग्रेसचे विद्यमान खासदार ॲड गोवाल पाडवी यांना फटकारले आहे. मतदारसंघातील कामांचे श्रेय कोणाचे हा वाद सध्या येथे रंगला आहे. यासंदर्भात डॉ गावित यांनी खासदार पाडवी यांना थेट इशाराच दिला आहे.

त्याला निमित्तही तसेच घडले आहे. नुकतेच अमृत भारत योजनेअंतर्गत नंदुरबार येथे नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळाली. ११.५० कोटी रुपयांच्या या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. रेल्वे विभागाने तशी घोषणा नुकतीच केली.

यामध्ये सध्याच्या रेल्वेस्थानकानजीकच एक नवीन मात्र हेरिटेज अर्थात वारसा स्थळ वाटावी अशी रेल्वे स्थानकाची इमारत बांधली जाणार आहे. या कामाची घोषणा सध्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार पाडवी यांच्या कार्यकाळ सुरू झाल्यावर झाली. मात्र त्याची प्रक्रिया गतवर्षीच सुरू झाली होती.

यामध्ये सध्याच्या रेल्वेस्थानकानजीकच एक नवीन मात्र हेरिटेज अर्थात वारसा स्थळ वाटावी अशी रेल्वे स्थानकाची इमारत बांधली जाणार आहे. या कामाची घोषणा सध्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार पाडवी यांच्या कार्यकाळ सुरू झाल्यावर झाली. मात्र त्याची प्रक्रिया गतवर्षीच सुरू झाली होती.

डॉ गावित यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार ही योजना मंजूर झाली आहे. त्याची निविदा आणि वर्क ऑर्डर ५ जूनला झाली आहे. त्यामुळे खासदार पाडवी यांनी या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप करू नये, असा इशारा दिला आहे.

खासदार पाडवी रेल्वे स्थानकावर जाऊन कामाची पाहणी करतात. कोणती कामे झाली आहेत, याची माहिती देतात. सध्याच्या मंजूर झालेल्या रेल्वे स्थानकाच्या कामाचे श्रेय त्यांना घ्यायचे आहे, असे गावित यांचे मत आहे.

मात्र खासदार पाडवी यांनी तसे करू नये. हवे तर त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहावे. त्यातून त्यांना कोणाच्या कारकिर्दीत कोणती कामे मंजूर झाली, याची माहिती मिळेल. याची माहिती घेतल्यास त्यांना माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या कामांची यादी मिळेल, असे डॉ. गावित म्हणाल्या आहेत.

त्यात जी कामे राहून गेली असतील, त्यांचा पाठपुरावा खासदार पाडवी यांनी करावा. मात्र न केलेल्या कामाचे श्रेय घेतल्यास त्याला उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. यामध्ये अनेक ठिकाणी सत्तांतर झाले. त्यात राज्यात भाजपच्या विद्यमान खासदारांना पराभवाचा फटका बसला. मात्र विकास कामांची प्रक्रिया प्रदीर्घ काळ चालते. सध्या अनेक कामांची मंजुरी मिळत आहे. शासनाकडून कामांच्या घोषणा होत आहे.

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे यापूर्वी भाजप खासदारांनी शिफारस केलेल्या कामांची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असते. त्यातून या कामांना मंजुरी मिळाली आहे.

नंदुरबार रेल्वे स्थानकापासून तर मनमाड -धुळे -इंदूर रेल्वे मार्गाच्या दोन मोठ्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र ही मंजुरी विद्यमान खासदारांच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मिळाली. त्यामुळे नव्या खासदारांना आपल्या कार्यकाळात ही कामे पूर्णत्वास येतील, हे समाधान आहे.

कामाची मंजुरी मिळाली मात्र निवडणुकीत पराभव झाला असल्याने सत्ता गेल्यावर ही मंजुरी मिळाली याची खंत भाजपच्या माजी खासदारांना आहे. त्यांच्या समर्थकांनाही त्याची तुटपुट लागून राहिली आहे. त्यामुळे सध्या नंदुरबारमध्ये देखील आजी-माजी खासदारांमध्ये विकास कामांच्या श्रेयाची राजकीय लढाई सुरू आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT