नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम तोरणमाळ येथे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात आयोजित कार्यक्रमाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या दुर्गम भागातील शाळेत प्रथमच शिक्षणमंत्री पोहोचल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
कार्यक्रमादरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे आणि आमश्या पाडवी ( Amshya Padavi) यांनी शाळेची घंटा वाजवून नव्या शैक्षणिक सत्राची औपचारिक सुरुवात केली. विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रेरणा मिळावी आणि शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. दादा भुसे आणि आमदार आमश्या पाडवी यांनी विद्यार्थ्यांच्या हातात नवीन वह्या, पेन आणि दप्तर देत त्यांना शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
यावेळी बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्य सरकार शिक्षण क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे सांगितले. दुर्गम आणि आदिवासी भागातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विविध योजना आणि सुविधा राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधने, पायाभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाबद्दलची सकारात्मक भावना अधिक दृढ झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.