Eknath Khadse, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : खडसेंनी मैत्रीचा हात पुढे केला, भाजप नेत्यांनी तो झटकला ; न फडणवीस आले, न महाजन !

Devendra Fadnavis and Girish Mahajan Skip Khadse’s Event : आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्यातील तसेच केंद्रातील सर्वच नेत्यांनी पाठ फिरवली.

Ganesh Sonawane

Eknath Khadse Birthday : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली.

विशेष म्हणजे, खडसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपमधील अनेक नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमाला भाजपचा एकही वरिष्ठ नेता उपस्थित न राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणी कुणाचा कायमचा शत्रु नसतो. ही राजकारणातील प्रचलित म्हण आहे. तोच विचार करुन जेष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या राजकीय विरोधकांसमोर मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र, भाजप नेत्यांसह महायुतीमधील अनेकांनी तो हात झटकला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पत्रिकेत शरद पवार यांच्या बरोबरीने स्थान देण्यात आलं होतं. दोघांचाही निमंत्रण पत्रिकेत विशेष उपस्थिती म्हणून उल्लेख होता. मात्र, फडणवीसांनी या सोहळ्याला दांडी मारली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीचीही शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

इतकच काय तर जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदारांसह जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसले. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडून या सगळ्यांना सोहळ्याला जायचं नाही असा अलिखित व्हीप होता, असेच बोलले जात आहे.

खडसेंनी आपले कट्टर राजकीय विरोधक असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनाही निमंत्रण दिलं होतं तेही कार्यक्रमाला आले नाहीत. तसेच आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री सुरेश जैन, मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे निमंत्रण पत्रिकेत झळकली होती. यातील कुणीही कार्यक्रमाला आलं नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, आदी नेत्यांचे तर दौरे निश्चित झाले होते. तरी देखील या सोहळ्याला ते ऐनवेळी अनुपस्थितीत राहिले.

विशेष म्हणजे खडसेंचा वाढदिवस २ सप्टेंबरला असतो, मात्र केंद्रातील भाजपच्या दोन नेत्यांना त्या तारखेला येणे शक्य नव्हते म्हणून खडसेंनी सोहळ्याची तारीख दोन दिवस आधी म्हणजे ३० ऑगस्टला ठेवली. मात्र, ज्यांच्यासाठी खडसेंनी तारीख बदलवली ते भाजप नेतेही सोहळ्याला अनुपस्थितीत राहिले. त्यामुळे केंद्रातील नेत्यांनाही ठरवून रोखण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खडसे यांनी मैत्रीचा हात पुढे केला असला, तरी भाजप नेत्यांकडून त्याला अजिबातही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, या सोहळ्याला खासदार शरद पवार यांची विशेष उपस्थिती लाभली. पवार यांनी आपल्या भाषणात खडसेंच्या राजकीय योगदानाचे कौतुक केले. महाराष्ट्रात भाजप उभा करण्यात एकनाथ खडसे आणि प्रमोद महाजन यांचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. विधानसभेतील खडसेंच्या प्रभावी कामगिरीचाही पवारांनी उल्लेख केला.

एकीकडे खडसेंच्या राजकीय योगदानाचे शरद पवारांकडून जाहीर कौतुक होत असताना, दुसरीकडे त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ऐकेकाळी खडसे भाजपमध्ये होते. ते राज्याचे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, परंतु केंद्रातील भाजप नेत्यांनी फडणवीसांना आशिर्वाद दिला. तरीही फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात खडसेंकडे एकाचवेळी १२ खाती होती. मुख्यमंत्र्यानंतर मंत्रिमंडळावर त्यांचाच प्रभाव होता. परंतु २०१६ मध्ये एका प्रकरणात एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तिथून खडसे-फडणवीस यांच्यातील संबंध पूर्णपणे बिघडले.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत तर त्याचं टोकाचं राजकीय वैर निर्माण झालं. त्यातूनच खडसेंची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी होऊ शकली नाही असे बोलले जाते. या सगळ्या बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यास भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

खडसेंच्या सोहळ्याला केंद्र आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाची तसेच नेत्यांची अनुपस्थिती ही केवळ औपचारिक गैरहजेरी म्हणून पाहता येणार नाही. भाजपमध्ये प्रदीर्घकाळ काम केलेल्या खडसेंनी जुन्या सहकाऱ्यांना निमंत्रण देऊन राजकीय संवादाची दारे उघडी करण्याचा प्रयत्न केला; मात्र केंद्र आणि राज्यातील प्रमुख नेत्यांनी कार्यक्रमापासून अंतर राखल्याने खडसे आणि भाजपमधील राजकीय दुरावा अद्याप कायम असल्याचे संकेत मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT