Jalgaon Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे हे विरोधी पक्षाच्या बळावर जळगाव जिल्ह्यातील विकास थांबवितात. त्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर आरोप करतात आणि त्यांना ‘ब्लॅकमेलिंग’ करतात, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केला. बैठकीला उपस्थित असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप, शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या निषेधाचा ठरावही मंजूर केला. (Eknath Khadse 'blackmail' officials: BJP MLA Mangesh Chavan's serious allegation)
जळगाव जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज (ता. २१ ऑगस्ट) नियोजन भवनात घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे तसेच कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी खासदार उन्मेश पाटील उपस्थित होते. या वेळी खासदार रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसे मात्र अनुपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जळगाव ते चाळीसगाव रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, जिल्ह्यात ४५० कामांसाठी ९३९ कोटी रूपयांचा निधी मंजूर असताना कामांचे कार्यारंभ आदेश दिले जात नाहीत. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, वरीष्ठ स्तरावरूनच ‘स्टे’ आला आहे. त्यावेळी आमदार चव्हाण यांनी एकनाथ खडसे हेच रस्त्याच्या कामास स्थगिती आणतात. त्यानंतर त्यांच्याकडून अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग होते, असा खळबळजनक आरोप केला.
खडसेंनी स्वतःच्या घरी अधिकारी कामाला लावला होता
आमदार चव्हाणांची हीच ‘री’ ओढत ग्रामविकास मंत्री महाजन यांनीही आमदार खडसेंवर आसूड ओढले. त्यांनी थेट मागचे पुढचे सर्वच काढले, ते म्हणाले, विरोधी पक्षात राहून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंगचे काम करायचे आणि स्वत:च्या घरी अधिकारी पोसायचे. हेच काम त्यांनी केले. ‘बोरसे’ नावाचा अधिकारी स्वत:च्या घरी कामाला लावला होता. दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण स्वत: किती शुद्ध आहोत, हे त्यांनी सांगावे असा टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.
खडसेंच्या निषेधाचा ठराव
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही मुक्ताईनगरात कामे होऊ दिली जात नाही. प्रत्येक कामात अडथळा निर्माण केला जातो, असे सांगितले. आमदार किशोर पाटील यांनीही कामे थांबविणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे, असे सांगितले. खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासात कुणी अडचण निर्माण करत असेल, तर अशा झारीतील शुक्राचार्याच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्याची विनंती केली. त्यावर सभागृहाने अनुमोदन दिले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.