Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: एकनाथ खडसे यांची प्रशासक मंडळाविरोधात न्यायालयात धाव!

Sampat Devgire

जळगाव : जिल्हा (Jalgaon) दूध संघावर शासनाने (Eknath Shinde) केलेली प्रशासक नियुक्ती ही बेकायदा आहे. सहकार कायदा (७३ एए) नुसार संबंधित सहकार संस्थेवर आरोप सिद्ध झाला असेल, त्यांची चौकशी होऊन अहवाल आला असेल तर प्रशासक मंडळ बरखास्त करता येते. या ठिकाणी अशी कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे शासनाने केलेल्या संचालक मंडळ बरखास्तीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. (Eknath Khadse blaim BJP for politics in milk fedration)

या याचिकेची येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव येथे मुक्ताई बंगल्यावर शुक्रवारी (ता. २९) पत्रकार परिषद झाली. माजी मंत्री खडसे म्हणाले, की जळगाव जिल्हा दूध संघ अवसायनात असताना त्याची जमीन व कारखाना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्या वेळी आपण राज्याचे मंत्री असताना एनडीडीबीचे वर्गिस कुरियन यांना भेटून हा संघ त्यांना चालविण्यासाठी हस्तांतरित केला. त्या वेळी पुनर्वसनासाठी शासनाने ६.२५ कोटी रुपये आर्थिक मदत केली होती. १९९५ पासून त्यांनी संघाचे व्यवस्थापन ताब्यात घेतले.

राज्य शासनाने १९९५ पासून २०१५ पर्यंत वेळोवेळी शासन निर्णय घेऊन प्रशासकीय मंडळास मुदतवाढ दिली. राष्ट्रीय विकास बोर्डाच्या प्रशासकीय मंडळाने संघाचे प्रत्येक वर्षी शासकीय लेखापरीक्षण केले, त्यामध्ये संघाला सातत्याने ‘अ’ वर्ग प्राप्त झालेला आहे. आज संघाच्या भागभांडवलात १५ कोटींपर्यंत वाढ झालेली आहे. संघ आजपर्यंत सतत नफ्यात असून, संघाची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. मात्र ज्यांना संघाची परिस्थिती पाहावत नाही, त्यांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय सूडबुद्धीचा निर्णय

जिल्हा दूध संघावर प्रशासक मंडळ बसविण्याचा घेतलेला निर्णय हा राजकीय सुडापोटी घेण्यात आला आहे, असा स्पष्ट आरोपही खडसे यांनी केला. ते म्हणाले, की सहकार कायदा कलम (७८ एए)नुसार जर एखाद्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर गैरव्यवहाराचा आरोप चौकशीअंती सिद्ध झाला, तसेच त्याची चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अशा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त करता येते, मात्र जिल्हा दूध संघाची कोणतीही चौकशी सुरू नाही, संचालक मंडळावर कोणतेही आरोप नाहीत, त्यांना त्याबाबत कोणतेही पत्र नाही. तरीही हे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले त्यामुळे हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसत आहे.

भरतीच नाही तर भ्रष्टाचार कसा?

जिल्हा दूध संघात कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र जिल्हा दूध संघात एकाही कर्मचाऱ्याची भरती झालेली नाही. उच्च न्यायालयात या कर्मचारी भरतीची याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे संघाने कोणत्याही प्रकारे नोकरभरती केलेली नाही. त्यामुळे हे आरोपही खोटे आहेत.

गिरीश महाजन यांची तक्रार

जिल्हा दूध संघाच्या कारवाईबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, की गिरीश महाजन व एन. जे. पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून प्रशासक मंडळ नियुक्तीची कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील पत्रात त्याचा उल्लेख आहे. एन. जे. पाटील हे संघाचे बडतर्फे कर्मचारी आहेत. त्यांनी यापूर्वीही संघावर आरोप केले आहेत. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आरोपाचा विचार कसा करण्यात आला. कोणत्याही लेखापरीक्षणाचा आक्षेप नाही, तसेच कोणत्याही चौकशीचा अहवाल नाही. त्यामुळे ही कारवाई चुकीची आहे.

संचालक मंडळाची आज सभा

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची सभा शनिवारी (ता. ३०) होत आहे. मात्र शासनाने हे मंडळ बरखास्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबत खडसे म्हणाले, की मंडळ बरखास्तीचे कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही, तसेच नवीन प्रशासक मंडळ नियुक्तीचे कोणतेही अधिकृत आम्हाला कळविलेले नाही. त्यामुळे शनिवारी संचालक मंडळाची सभा होईल.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT