Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे `मालेगाव`च्या ट्रॅपमध्ये अडकणार!

जिल्ह्याच्या घोषणेला सहकारी आमदारांबरोबरच भाजप, राष्ट्रवादीचे आमदारांचाही विरोध.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

प्रमोद सावंत

मालेगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्यव्यापी दौऱ्याअंतर्गत ‘मुख्यमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमातून मालेगाव (Malegaon) दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मालेगाव जिल्ह्याची (Malegaon Districts) घोषणा करतील असे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या घोषणेला सहा पैकी चार आमदारांनी लाल निशान फडकवले आहे. त्यामुळे अशी घोषणा झाल्यास मुख्यमंत्री त्या ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता आहे. (4 out of 6 MLA opposed praposed Malegaon District)

CM Eknath Shinde
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात शिवसेनेचे विघ्न?

राज्यव्यापी दौऱ्याला त्यांनी तालुका पातळीवरील शहरापासून सुरवात करण्यामागे उठावात खंबीरपणे पाठीशी राहिलेले वरिष्ठ माजी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांना बळ देणे हा हेतू आहे. त्यात दादा भुसे यांना आपल्या राजकीय प्रभावासाठी मालेगाव जिल्हा व्हावा असे वाटते. मात्र या घोषणेला खुद्द दुसरे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनीच कानावर हात ठेवले आहेत. भाजपचे डॅा. राहुल आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार, बागलाणाचे भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांचाही विरोध असल्याने अशी घोषणा झाल्यास नव्या राजकीय वादाची बीजे पेरली जातील, अशी शक्यता आहे.

CM Eknath Shinde
Sharad Pawar: सरकार केव्हा पडेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही!

त्यापाठोपाठ या दौऱ्याला अनेक कंगोरे आहेत. उत्तर महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र सातत्याने नाशिक राहिले आहे. राज्यात प्रथमच तालुका पातळीवर विभागीय आढावा बैठक होत आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणापाठोपाठ उत्तर महाराष्ट्राचा अनुशेष भरून काढण्यासाठी विभागातील जनतेला नार-पार योजनेच्या घोषणेची अपेक्षा आहे. त्याचबरोबर येथील जनमताचा रेटा जिल्हानिर्मितीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील जिल्हानिर्मितीचे आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची घोषणा करून आपल्या दैवताच्या वचनपूर्तीची संधी साधावी, हीच अपेक्षा आहे.

चार दशकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी सर्वप्रथम जिल्ह्याची घोषणा केली होती. मात्र सिमेंट घोटाळ्यात त्यांची खुर्ची गेल्याने जिल्हानिर्मिती होऊ शकली नाही. यानंतर काँग्रेस अथवा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासन तसेच भाजप-शिवसेना युतीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने जिल्हानिर्मिती करू, असे आश्‍वासन दिले. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील जिल्हानिर्मितीचे आश्‍वासन दिले होते. शिवसेनाप्रमुखांना दैवत मानणाऱ्या व दिलेला शब्द पाळणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांना ही नामी संधी आहे. त्यांनी जिल्ह्याची घोषणा करावी. मुख्यमंत्री आज रात्री उशिरा येथे दाखल होतील.

शनिवारी त्यांचा मालेगावकरांतर्फे नागरी सत्कार, जाहीर सभा होईल. उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मोठा अनुशेष आहे. औद्योगिक वसाहत व सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये खर्चाचे कृषी विज्ञान संकुल ही तालुक्यासाठी समाधानाची बाब असली तरी या वसाहतीत उद्योगांसाठी राजकीय पाठबळ गरजेचे आहे.

उत्तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम्‌ सुफलाम्‌ करावयाचा असल्यास नार-पार योजना, पश्‍चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी करणे, मालेगाव जिल्हानिर्मिती, मनमाड, नामपूर तालुकानिर्मिती, मांजरपाडा- २ प्रकल्प, वांजूळ पाणीयोजना, अमृत योजना जलवाहिनी टप्पा क्रमांक- २, मलनिस्सारण प्रकल्प टप्पा- २ आवश्‍यक आहे. तळवाडे येथून शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली आहे. नवीन जलवाहिनीसाठी महापालिकेला निधीची आवश्‍यकता आहे. हरणबारी धरणाची उंची वाढवणे, गिरणा, हरणबारी धरणातील गाळ काढण्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना चालना देणे, कृषिप्रक्रिया उद्योगांना हातभार लावणे आदी कामांच्या अपेक्षा आहेत.

प्रत्यक्ष कृतीची गरज

गुजरात व मध्य प्रदेश उत्तर महाराष्ट्राला लागून असल्याने येथील दळणवळण, व्यापार उद्योगवाढीसाठी रस्ते विकासाचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यात व नंदुरबार परिसरात अनेक नवीन पर्यटनस्थळे निर्मितीसही मोठा वाव आहे. मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा करूया. स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना वर्षानुवर्षे मागणी करीत आहेत. या वेळीही निवेदनांचा खच पडेल. मात्र, आश्‍वासनापलीकडे प्रत्यक्ष कृतीसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मुख्यमंत्री शिंदेंना उत्तर महाराष्ट्राने उठावात बळ दिल्यामुळे त्यांनी या मागण्यांची पूर्तता करावी.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com