Eknath khadse, devendra fadanvees Sarakarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : ACB चा सापळा लावतो म्हणत पोलिसाला धमकी; गृहमंत्र्यांवरही आक्षेपार्ह विधान, खडसेंवर आता डायरेक्ट FIR दाखल

Eknath Khadse FIR : एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. जळगावच्या सावदा पोलीस ठाण्यात स्वत:पोलिसांनीच खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. पोलिसाला धमकी दिल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा वाद स्थानिक पातळीवर पुरता मर्यादीत न राहता थेट गृह खात्याशी जोडला गेला असून त्यामुळे स्वतः पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणात, सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास विधान परिषदेचे सदस्य एकनाथ खडसे सावदा पोलिस ठाण्याच्या आवारात आले. त्यानंतर त्यांनी तासखेडा ता. रावेर येथील गौणखनिज संदर्भात गुन्हा दाखल का केला नाही ? अशी आमच्याकडे विचारणा केली. आमच्यावर 'लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा लावतो, अशी धमकी देत दमदाटी केली. तसेच अपमानास्पद बोलले. महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना अश्लील भाषेत मोठमोठ्याने शिवीगाळ केली, असा आरोप देखील यावेळी खडसेंविरोधात करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार खडसे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडसेंनी राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह आणि अत्यंत खालच्या पातळीवरची विधाने केली. कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षकांशी अरेरावीची भाषा केली. पोलिसांवर दबाव आणत शासकीय कामात अडथळा आणला असा आरोप खडसेंवर करण्यात आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगरच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तपास सोपविला आहे.

दरम्यान या सर्व प्रकारावर एकनाथ खडसे यांनी गुन्हा दाखल झाल्याचे समजतात आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसेंनी आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे. एकनाथ खडसे म्हणाले, एका व्यक्तीने सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिज चोरी प्रकरणाशी संबंधित तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी याप्रकरणात कोणतीही कारवाई न करता कारवाईस टाळाटाळ केली. डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मी विधान परिषदेत प्रश्नही उपस्थित केला. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाने चौकशी व कारवाई केली नाही, म्हणून मी सावदा पोलिस ठाण्यात त्या संदर्भात तक्रारदारासोबत चौकशी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा पोलिस निरीक्षकाने माझ्याशी अरेरावीची भाषा वापरली असं खडसेंनी म्हटलं आहे.

तसेच, रागाच्या भरात माझ्याकडूनही काही अपशब्द वापरले गेले. मात्र, मी तत्काळ माफी मागत दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर मी तिथून निघून आल्यानंतर संबंधित पोलिस निरीक्षकाने माझ्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दिल्याचे समजले आहे. परंतु संबंधित निरीक्षकच माझ्याशी अरेरावीने वागला, त्याबद्दल मी पोलिस प्राधिकरण आणि पोलिस महासंचालकांकडे तक्रार करणार असून विधिमंडळात विशेष अधिकारभंगाची सूचना देणार असल्याचे खडसेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT