BJP politics : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. त्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अडचणीत आणले. मात्र या सर्व घडामोडीत स्वतः खडसेच आता राजकीय चक्रव्युहात अडकतात की काय अशी स्थिती आहे. कारण शरद पवार यांची साथ त्यांनी सोडली आहे. मात्र, त्यांचा भाजपमधील प्रवेश अजूनही झालेला नाही. प्रवेशासाठी त्यांना ताटकळत ठेवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय डावपेचांनी जेरीस येऊन माजी मंत्री खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. विधान परिषदेतील पक्षनेते देखील केले. मात्र मुळ भाजपचा पिंड असल्याने त्यांची राजकीय अस्वस्थता संपली नाही. यातूनच ते आता स्वतःचा निर्माण केलेल्या राजकीय चक्रव्युहात अडकण्याची चिन्हे आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी खडसे यांना रावेर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले होते. तशी तयारी देखील सुरू करण्यात आली होती. त्यामुळेच भाजपने खासदार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीचा फेरविचार सुरू केला होता. शेवटच्या टप्प्यात भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कौटुंबिक राजकीय डावपेच आखण्यात व्यग्र असलेल्या खडसे यांनी 'राष्ट्रवादी'ची (शरद पवार गट) उमेदवारी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना शरद पवार गट अडचणीत आला होता.
सध्या खडसे यांनी भाजप प्रवेशमध्ये प्रवेश करण्याचे घोषित केले आहे. मात्र त्यांच्या कन्या रोहिणी खडसे शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून कायम राहणार आहेत. त्यामुळे खडसे भाजपच्या वाटेवर, त्यांच्या सुनबाई भाजपच्या खासदार, मुलगी शरद पवार गटात अशी स्थिती आहे. एकाच कुटुंबात विविध पक्षांमध्ये आणि विविध सत्ता पदे राखण्यासाठी केलेली ही अत्यंत विचारपूर्वक खेळी म्हणून त्यांचे विरोधक त्याकडे पाहतात. त्याचा परिणाम आता त्यांच्या राजकारणावर होण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत स्वतः खडसे यांनी भाजपमध्ये असलेल्या आपल्या अनुयायांसह पर्यायी यंत्रणा उभी करून रक्षा खडसे यांचा प्रचार केला. मात्र या मतदारसंघाची जबाबदारी त्यांचे कट्टर विरोधक मंत्री महाजन यांच्याकडे आहे. रक्षा खडसे विजयी झाल्यास त्याचे श्रेय खडसे घेतील,अशी भीती अनेकांना वाटते. परिश्रम महाजन यांचे आणि श्रेय खडसे यांना हे वरिष्ठ नेत्यांनाही पसंत पडणारे असेल की नसेल यावर चर्चा होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यांच्याकडे जवळपास 11 खात्यांचा कार्यभार होता. पर्यायी सत्ता केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्याचाच राजकीय फटका त्यांना बसला. मंत्री महाजन हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आहे. महाजन यांनी प्रत्येक प्रकरणात प्रत्येक टप्प्यात खडसे यांच्याशी प्रखर शत्रुत्व घेतले. त्यामागे कोण असावे हे लपून राहिलेले नाही, अशा स्थितीत केंद्रातील भाजप नेत्यांकडून खडसे यांना पक्षप्रवेश देण्याच्या हालचाली होत्या. लोकसभा निवडणुकीच्या धावपळीमुळे पक्षप्रवेश थंडबस्त्यात गेला.
जळगाव जिल्ह्यातील राजकारणात नवा पेच निर्माण होऊ शकतो. भाजपात दोन सत्ता केंद्र झाल्यास त्याचा फटका गिरीश महाजन यांना बसेल. याबाबत दोघांचेही समर्थक आणि कार्यकर्ते अत्यंत आग्रही असल्याने खडसे यांच्या प्रवेशात अडथळे निर्माण झाल्याचे बोलले जाते. खडसे यांचा भाजप प्रवेश रखडल्याने त्यांच्या समर्थकांना अस्वस्थ वाटू लागले आहे. भाजपचे महाराष्ट्राचे नेतृत्व उपमुख्यमंत्री फडणवीस करीत आहेत. खडसे यांचा प्रवेश झाल्यास हे फडणवीस यांना अप्रत्यक्ष आव्हान देखील असेल. त्यामुळे आगामी काळात खडसे यांना भाजप नेत्यांकडून प्रवेशासाठी ताटकळत ठेवले जाण्याची शक्यता आहे.
केंद्रातील नवी समीकरणे त्यात भर घालत आहेत. यातून खडसेना राष्ट्रवादीत (शरद पवार गट) ना भाजपमध्ये अशी स्थिती आहे. एक प्रकारे ही त्यांची सक्तीची राजकीय निवृत्ती ठरावी, अशा हालचाली भाजपच्या आतील गोटातून होत असल्याचे कळते. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकाल आल्यानंतर जळगावच्या राजकारणात काय घडते? हा उत्सुकतेचा विषय आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.