Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

हिरे, चौधरी, पाटील, खडसेंचे मुख्यमंत्री पद हुकले, गिरीश महाजन तरी होतील का?

Sampat Devgire

कैलास शिंदे

जळगाव : गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे एकनाथ खडसे हेच प्रबळ दावेदार होते. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडून देवेंद्र फडणवीस यांना सधी मिळाली. त्यानंतर स्पर्धक म्हणून खडसे यांच्यावर अन्यायच झाला. मात्र यापूर्वी उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब चौधरी, रोहीदास पाटील यांचीही संधी हुकली आहे. त्यामुळे भाजपचे दुसरे दावेदार गिरीश महाजन यांना संधी मिळले मात्र देवेंद्र फडणवीसांना दिल्लीला गेले तरच, असा चिमटा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला घेतला.

राज्यात मुख्यमंत्रीपदाची एकनाथ खडसे यांच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राची संधी भाजपने हुकाविली. गिरीश महाजन यांना संधी आहे पण फडणवीस दिल्लीला गेले तर असा टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी विधिमंडळात लगावला. मात्र काँग्रेस पक्ष सत्तेत असताना देखील काही नेत्यांची संधी हुकविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आज पर्यंत मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. परंतु आजपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील नेत्याला ही संधी मिळालेली नाही. काँग्रेसच्या काळात नाशिकचे भाऊसाहेब हिरे, जळगावचे मधुकरराव चौधरी, धुळे येथील रोहिदास दाजी पाटील यांची संधी हुकविण्यात आली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे राज्यातील बलाढ्य नेते होते. त्यांच्या नंतर डॅा. बळीराम हिरे आले. ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहीले. राज्यात काँग्रेसमध्ये फुट पडल्यावर अनेक नेते शरद पवार यांच्या सोबत गेले. परंतु डॅा. हिरे एकनिष्ठ राहिले. आणीबाणी नंतर १९८० मध्ये इंदिरा गांधी यांची पुन्हा लाट आली. त्यात ते दाभाडी मतदारसंघातून निवडून आले. त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र इंदिरा गांधी यांनी आपले निष्ठावंत बॅरिस्टर अ. र. अंतुले यांना संधी दिली. पुढे सिमेंट प्रकरणात अंतुले यांचे पद गेले. त्यानंतरही हिरे यांना संधी मिळाली नाही. पुढे त्यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारीच दिली नाही. त्यामुळे अखेर त्यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न स्वप्नच राहिले.

खानदेशातील जळगावच्या प्रतिभाताई पाटील या काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या. मुख्यमंत्री शरद पवार यांचे पुलोदचे सरकार असताना प्रतिभाताई पाटील राज्याच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. पुढे १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या मुक्ताईनगर मतदार संघातून निवडून आल्या. त्या वेळी काँग्रेस बहुमताने निवडून आली. विरोधी पक्षनेत्या असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अस वाटत होतं. परंतु इंदिरा गांधी यांनी अंतुले यांना मुख्यमंत्री केले. पुढे प्रतिभाताई राज्यसभेत गेल्या. राज्यपाल व देशाच्या राष्ट्रपती झाल्या, परंतु मुख्यमंत्री पदाचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

जळगावच्या रावेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब चौधरी हे सुध्दा काँग्रेसचे एकनिष्ठ. वयाच्या २४ व्या वर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. काँग्रेसतर्फे ते रावेर मतदारसंघातून निवडून येत असत. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री पद भूषविले. शिक्षण मंत्री म्हणून त्यांचे कार्य राज्याला विशेष लक्षात राहिले. काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव कायम चर्चेत होते. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. त्यांना राज्य विधिमंडळाचे सभापतीपद मिळाले. पुढे त्यांनी काँगेस पक्ष सोडून शरद पवार यांच्या काँग्रेस (एस) पक्षात प्रवेश केला होता. मात्र नंतर ते पुन्हा काँग्रेस पक्षात गेले. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही.

धुळ्याचे येथील काँग्रेस पक्षाचे आमदार रोहिदास दाजी पाटील हे कॉंग्रेसचे एकनिष्ठ. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची संधी आली होती. मात्र इंदिरा गांधी यांना शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना संधी दिली. रोहिदास दाजींचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच राहीले.

राज्यात २०१४ मध्ये भाजप सेना युतीची सत्ता आली. तेव्हा विरोधी पक्ष नेते असलेले जळगावच्या मुक्ताईनगरचे एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल असे वाटत होते. मात्र पक्षातील दिल्लीतील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. पुढे खडसे यांच्यावर आरोप झाले. २०१९ मध्ये भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही. अखेर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांचेही स्वप्न अपूर्णच राहिले. आत्ता गिरीश महाजन यांना संधी मिळते का ते भविष्यात दिसून येईल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT