जळगाव : चोपडा (Jalgaon) तालुक्यात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक व अन्न- औषध प्रशासनाच्या (FDA) संयुक्त कारवाईत गुरुवारी रसायनयुक्त दुधाचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर या प्रकारातून गंभीर तथ्ये बाहेर येत आहेत. अशाप्रकारच्या दुधाच्या गोरखधंद्यातून थेट नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले असून, या कारवाईत सातत्य हवे, अशी अपेक्षाही सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर- पाटील यांच्यासह अन्न- औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखा अशा तिघा यंत्रणांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी बिडगाव (ता. चोपडा) येथे एका शेतात रसायनयुक्त दूधनिर्मितीच्या कारखान्यावर कारवाई केली. पामतेल व दुधाची भुकटी या मिश्रणातून तयार होत असलेले हे दूध जळगावसह उत्तर महाराष्ट्रात वितरित होत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यातून समोर आला.
जिवाशी खेळ
दूध खरेतर पूर्णअन्न मानले जाते. मात्र, बाजारातील दूध शुद्ध आहे की त्यात जिवाशी खेळ करणारी भेसळ होतेय, याबाबत अनेकदा साशंकता असते. त्यातच बिडगाव येथे विशेष पथकाच्या कारवाईत रसायनाद्वारे निर्मित दुधाचा कारखाना नष्ट करण्यात आल्यामुळे आपण नेमके कोणत्या प्रकारचे दूध घेतो? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
पामतेलाचा सर्रास वापर
एरवी कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी पामतेल हे घातक मानले जाते. मात्र, थेट दूध बनविण्यासाठी जर पामतेलाचा वापर होत असेल, तर ते अधिकच गंभीर. कारण, दुधाचा वापर होत नसेल असे कोणतेही घर नाही. त्यातही लहान मुलांना तर दूधच दिले जाते. त्यामुळे पामतेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध बनविण्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये धडकी भरली आहे.
कॅन्सर, किडनीवर परिणाम
अशाप्रकारे पामतेल व अन्य रसायनांच्या दूध अथवा अन्य पदार्थांमुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. किडनीचे विकारही त्यामुळे उद्भवू शकतात. पामतेलाच्या सातत्यपूर्ण वापराने हृदयविकारही झाल्याची उदाहरणे आहेत. लहानपणापासून हे वापरात आले तर मेंदूचे विकारही होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कारवाईत हवे सातत्य
चोपड्यात पोलिस व अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून, त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांवर वचक राहील, असे बोलले जात आहे. मात्र, एखाद- दुसरी कारवाई होऊन नंतर पुन्हा त्याबाबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे अशाप्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भेसळयुक्त दुधाच्या निर्मिती अड्ड्यांवर याआधीही कारवाई केलेली आहे. मात्र, पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणेअभावी विभागाला मर्यादा आहेत. तरीही यापुढे अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने करण्यात येतील.
-विवेक पाटील, सहाय्यक आयुक्त, अन्न-औषध प्रशासन
...
पामतेलाचे मिश्रण वापरून दूध तयार होण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पामतेलाच्या वापरातून किडनी, आतड्यांचे विकार होतात. प्रसंगी हृदयविकार आणि मेंदूचे विकारही उद्भवू शकतात. नागरिकांनी वापरात येणारे दूध भेसळयुक्त नाही, याची खात्री करूनच ते खरेदी करावे.
-डॉ. अनिल पाटील
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.