Muktainagar Assembly Constituency: मुक्ताईनगर मतदार संघात विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच आरोप, प्रत्यारोपांनी गाजत आहे. येथे पुन्हा एकदा 2019 च्या लढतीची पुनरावृत्ती होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ॲड रोहिणी खडसे यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार ॲड रोहिणी खडसे या मतदारसंघात पुन्हा एकदा उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जळगाव जिल्ह्यातील सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा प्रचार प्रामुख्याने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भौतिक केंद्रित झाला आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात खडसे यांनी मतदारसंघासाठी काय केले? असे विचारण्यात येते. तीस वर्षात मतदार संघाचा काय विकास झाला? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला जातो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत.
ॲड खडसे यांनी मतदारसंघातील लोणखेडा, भिलवस्ती, उदळी खुर्द, उदळी बुद्रुक, तासखेडा, रणगांव, गहूखेडा, रायपूर अशा विविध गावांना प्रचार दौरा केला. यावेळी मुक्ताईनगर येथे माजी मंत्री खडसे यांनी बांधलेल्या सभागृहात प्रचाराची सभा झाली. ज्यांनी मतदारसंघात तीस वर्षात विकासाची कामे केली. अनेक प्रकल्प आणले.
मतदारसंघातील सामान्यांचे प्रश्न माजी मंत्री खडसे यांनी सोडवले. मात्र त्यांनी बांधलेल्या सभागृहातच भाजपचे कार्यकर्ते नाथाभाऊंनी काय केले? असा प्रश्न विचारतात.याचे आश्चर्य वाटते. ज्यांनी विकास केला, त्यांच्याकडेच विकासाचा हिशोब कसा मागता? असा सवाल त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगले फैलावर घेतले. केवळ मुक्ताईनगर एवढेच नव्हे तर सबंध जळगावच्या विकासासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. असे असताना भाजप व्यक्तिगत व्यक्तीगत रागातून त्यांच्यावर टीका करतात. हे राजकारण म्हणजे भाजपच्या प्रचाराची पातळी घसरली, याचे प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले.
या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर विजयी झाले होते. त्यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली होती. एकनाथ खडसे यांचे विरोधक आणि काही भाजप नेत्यांच्या पाठिंबातून त्यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता.
यंदा चित्र पलटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. आमदार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत अतिशय चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. सबंध जळगावच्या राजकारणात हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.