Raksha khadse, Girish Mahajan, Eknath Khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : नाथाभाऊंचा मोठा माइंड गेम, रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत भाजप काय निर्णय घेणार?

Political News : सर्वाधिक चर्चेत आता रावेर लोकसभा मतदारसंघ आला आहे. या ठिकाणी एकनाथ खडसे व गिरीश महाजन एकमेकांवर आरोप करीत कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Sachin Waghmare

Raver News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. उमेदवारी कुणाला मिळणार इथपासून ते कोण कुठून लढणार, याबाबत विविध चर्चा सुरू असताना दुसरीकडे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आता रावेर लोकसभा मतदारसंघ आला आहे. या ठिकाणी एकनाथ खडसे व गिरीश महाजन एकमेकांवर आरोप करीत कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत.

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात रावेरमध्ये भाजप खासदार रक्षा खडसे विरुद्ध सासरे एकनाथ खडसे अशी लढत होईल, अशी जोरदार चर्चा असताना आता प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेरमधून निवडणूक लढविणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.

एकनाथ खडसे यांच्या माघार घेण्यामुळे आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, या मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना शह देण्यासाठीच भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता एकनाथ खडसे यांनी अचानक माघार घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. (Eknath Khadse News)

जळगाव जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्याचा भाजपच्या वरिष्ठ पातळीवर प्लॅन होता. परंतु, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची जळगाव येथे पार पडलेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरून बोलताना थेट एकनाथ खडसे यांची रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपची अडचण झाली. भाजपने लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

एकनाथ खडसे यांच्याविरोधात ही उमेदवारी देण्यात आली खरी, परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले. यामुळे आपोआपच भाजपची मोठी अडचण झाली आहे. कारण आता इच्छा नसतानादेखील रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर तर केली. परंतु आता त्यांचा पत्ता कट केला, तर आपोआपच राजकीय वर्तुळात भाजपची नाचक्की झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना त्यांचे निकटवर्तीय माजी खासदार हरिभाऊ जावळे (Haribhau Jawale) यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना उमेदवारी द्यायची होती. परंतु, एकनाथ खडसे यांना शह देण्याच्या नादात जवळच्या व्यक्तीला डावलत एकनाथ खडसे यांच्या सून आणि सध्याच्या खासदार रक्षा खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

भाजपमध्ये द्विधा अवस्था

सध्या राजकीय वर्तुळात अशादेखील चर्चा होत आहेत की, एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्याऐवजी रोहिणी खडसे यांचीदेखील उमेदवार म्हणून घोषणा होऊ शकते. परंतु, रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता रक्षा खडसेंच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा यावरून भाजपमध्ये द्विधा अवस्था असून, एकनाथ खडसे यांनी एका दगडात दोन पक्षी मारताना भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत.

R

SCROLL FOR NEXT