Maharashtra politics : सत्ताधारी पक्षाच्या जळगावमधील एका बड्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. सावदा परिसरातील एका मोठ्या गावातील विधवा महिलेवर बलात्कार करण्यात आला असून तो एका राजकीय पदाधिकाऱ्याने केला असल्याचा दावा खडसेंनी केला आहे.
खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस प्रशासनावर आणि सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सावदा परिसरातील एका विधवा महिलेवर एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा दावा खडसे यांनी केला असून या प्रकरणात पोलीस तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.
दरम्यान खडसे म्हणत असलेला हा बडा पदाधिकारी कोण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खडसे यांचे म्हणणे आहे की, पीडित विधवा महिला सावदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. दुपारी १२ वाजेपासून तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत पीडित महिला पोलिस स्टेशनला थांबली. मात्र, इतक्या वेळ थांबूनही तिथे असलेल्या पोलीस निरीक्षकाने या महिलेची तक्रार नोंदवून घेतली नाही. याउलट तिला धमकावून घरी पाठवून दिल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.
पीडित महिलेवर बलात्कार करणारा व्यक्ती सत्ताधारी पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे. त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी संबधित महिला पोलिस स्टेशनला गेली होती. ही सगळी घटना पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. सीसीटीव्ही केबीनचे फुटेज मला द्या अशी मागणी मी केली आहे. परंतु आजून मला ते देण्यात आलेलं नाही. ही माझी माहिती आहे, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मला त्याची खात्री करायची आहे.
एका मोठ्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर बलात्कार करणे आणि पोलिसांनी अशा गंभीर गुन्ह्याची दखल न घेणे, हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचं खडसेंनी पत्रकारपरिषदेत म्हटलं. विशेषत: सात-सात तास पोलिस ठाण्यात थांबलेल्या बलात्कार पिडीत महिलेची तक्रार घेतली जात नाही हे गंभीर आहे असं खडसे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी यावेळी सावदा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकावरच निशाणा साधला. खडसेंनी भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करत एक फोटो पत्रकारांना दाखवला. त्याद्वारे त्यांनी पोलिस अधिकारी कशा प्रकारे मंत्र्यांसोबतचे फोटो आपल्या स्टेटसवर ठेवून त्यांना संरक्षण देतात हे सांगण्याचा प्रयत्न केला.
संबधित प्रकरणातील आरोपी पदाधिकाऱ्याला राजकीय संरक्षण मिळत असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मोठी हेराफेरी केली जात असल्याचा दावा खडसेंनी केला आहे. संबंधित पोलीस निरीक्षकाच्या कामकाजावर बोट ठेवताना खडसे म्हणाले की, हा अधिकारी केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही, तर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे काम करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.